बुलडाणा जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:27 AM2017-08-07T03:27:06+5:302017-08-07T03:27:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.
दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने यावर्षी जून, जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तविला
होता; मात्र जिल्ह्यात हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. जिल्ह्यात काही भागात लवकर तर काही भागात उशिरा हजेरी लावणाºया पावसाने नंतरच्या काळात खेळ चालविला आहे. चार-पाच दिवसांच्या अंतराने पाऊस येतो; पण पावसात जोर दिसत नाही. कुठे भुरभुरी तर कुठे रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतो. अद्याप जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यातही वाढ झालेली नसून, त्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. तर बरीच धरणे अद्याप कोरडी आहेत. दमदार पावसाअभावी विहिरींची जलपातळी कमी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
खामगाववर पाणीटंचाईचे सावट
खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. गेरु माटरगाव
धरणक्षेत्राला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी यावर्षी धरणाच्या जलपातळीत वाढ झालेली नाही. अर्ध्याच्यावर पावसाळा उलटून गेला आहे; मात्र धरणा
तील जलपातळी वाढलेली नाही. शहराची दररोजची पाण्याची गरज पाहता काही महिने पुरेल इतकाच जलसाठा धरणात आहे. सध्या शहराचा पाणीपुरवठा सातव्या दिवसावर पोहचला
आहे. आणखी काही दिवसात धरणाच्या जलसाठ्यात वाढ न झाल्यास शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. संभाव्य धोका ओळखून पाण्याचा जपून वापर करणे
आवश्यक आहे.