सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा शिवारात वाघुळजा नदीवर कोल्हापुरी बंधारा आहे. त्यावर तढेगाव, बारलिंगा दोन गावाच्या शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. यावर्षी पाऊस चांगला पडल्याने गावकऱ्यांनी श्रमदानातून बंधारा अडवून पाणी साठवले होते. बंधारा पूर्णपणे भरल्याने त्या भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणीसुद्धा केली. परंतु, पिकांना पाणी देणे सुरू असताना अज्ञात व्यक्तींनी २ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास बंधाऱ्यातील लोखंडी प्लेट खुल्या करून साठवलेले पाणी सोडून दिले. रात्रीतून अचानक पाणी नाहीसे झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. या नदीपात्रातून रेतीची चोरटी वाहतूकसुद्धा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. या वर्षी बंधाऱ्यात पाणी साठवल्याने रेती वाहतूक बंद होती. पाणी सोडून देण्यामागे रेतीमाफियांचा हात असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अज्ञात व्यक्तीने सोडून दिले बंधाऱ्यातील पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:52 AM