बुलडाणा, दि. २८- जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडलेला आहे. त्याचप्रमाणे माघारी मॉन्सूननेसुद्धा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नळगंगा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प तुडुंब भरले आहेत. या प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठय़ामधून बाष्पीभवन व अन्य व्यय वगळता उपलब्ध पाणीसाठय़ामधून रब्बी हंगाम, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पाणी आरक्षण समितीने जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सदर आरक्षण घोषित केले आहे. या सभेला अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनकुसरे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात सर्व ठिकाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके घेण्यासाठी पाणी देण्यात यावे. पाणी वापर संस्थांच्या मागणीप्रमाणे पाण्याचे आरक्षण करावे. संस्था व नगर परिषद यांनी ३0 नोव्हेंबर २0१६ पूर्वी थकबाकी जमा करावी, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. गरज नसताना बर्याच ग्रामपंचायती व नगर परिषदा पिण्याचे पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याची मागणी करतात; मात्र प्रत्यक्षात पाणी वापर करीत नाही. त्यामुळे ओलितासाठी पाणी वापर होत नसून, हे पाणी बाष्पीभवन होऊन नष्ट होते.उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करून रब्बी हंगामात जास्तीत जास्त पीक घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले.
जलसाठय़ांमधील पाणी आरक्षण जाहीर!
By admin | Published: October 29, 2016 2:43 AM