किनगावराजा : येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेडपूर्णा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारीसहा सर्व साहित्य प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे वाहून गेले. यासंदर्भात येथील सरपंच सुनील गोरे व ग्रामसचिव एस. ए. शिंगणे यांनी सिंदखेडराजाचे तहसीलदार यांना माहिती देऊन मदत करण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे.
मागील महिन्यात संपूर्ण राज्यात २९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे चोखासागर प्रकल्प पूर्णतः पाण्याने भरल्यामुळे त्यामधील पाण्याचा विसर्ग होण्याच्या दृष्टीने पाणी सोडण्यात आले. सोडलेल्या पाण्यामुळे हिवरखेडपूर्णा येथील नदीपात्रातील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील, पाइप, केबल, विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले. यामुळे गावाला पाणीपुरवठा करणे बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजने अंतर्गत संबंधित साहित्य खरेदी करण्यास तत्काळ सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच सुनील गोरे, ग्रामसचिव ए. एस. शिंगणे नंदकिशोर दत्तात्रय कुटे, श्रीधर दत्तात्रय कुटे, सुरेश वसंता वाघ, रमेश राघोजी भुसारी, कडुबा पर्वता कुटे, श्याम विजय राजमाने, शरद काशीनाथ नागरे यांनी केली आहे. याविषयी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी बुलडाणा, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा बुलडाणा तसेच गटविकास अधिकारी पं. स. सिंदखेडराजा आदींना निवेदन देण्यात आले आहे.
खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील सर्व साहित्य वाहून गेले आहे. गावकऱ्यांसह सर्व साहित्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु साहित्य सापडले नसल्याने गावाला पाणीपुरवठा करणे अशक्य झाले आहे. संबंधित विभागाने सर्व साहित्य तत्काळ उपलब्ध करून गावकऱ्यांची समस्या दूर करावी.
सुनील गोरे, सरपंच, हिवरखेडपूर्णा