लग्न झालं, वऱ्हाड निघालं, गाडी थांबली अन् वधू पळाल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:11 PM2021-01-13T12:11:01+5:302021-01-13T12:13:49+5:30
Bride Ran away News तीन तरुणांची लग्न करून देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील तीन तरुणांची लग्न करून देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी फसवणूक केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी वकिलांकडून बॉन्ड करून तीन तरुणांशी ७ जानेवारी रोजी लग्न केले. त्यानंतर ८ जानेवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास तीन वर, तीन वधू व अन्य एक व्यक्ती कारने गुजरातकडे निघाले असता जालना शहराजवळील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करीत गाडी थांबवली. त्यानंतर तिन्ही मुली तीन मोबाईल, रोख रक्कम ३० हजार असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्या. याप्रकरणात गुजरात येथील पीयूष शांतिलाल वसंत यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील पीयूष शांतिलाल वसंत (रा. जुनागड) यांच्या तीन मित्रांचे लग्न जमत नव्हते. त्यांनी जालना येथील मित्र पाशाभाई (पूर्ण नाव माहीत नाही) याला फोन करून मुलींबाबत विचारणा केली. त्याने पियुष वसंत यांना जालना येथे बोलावून घेतले. त्यानंतर तीन मुलांसह ते देऊळगाव राजा येथे गेले होते. तेथील एका महिलेने तीन मुली दाखविल्या. तिन्ही तरुणांनी लग्न करण्यास होकार दिला आणि वकिलाकडून बॉन्ड करून कायदेशीर लग्न केले.
त्यानंतर तीन मुली, अन्य एका व्यक्तीसह वाहनाने गुजरातकडे निघाल्या. जालना-औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करीत गाडी थांबवायला लावली. अंधाराचा फायदा घेऊन मुली फरार झाल्या. पीयूष वसंत यांनी संबंधित महिलेला फोन करून मुली पळून गेल्याचे सांगितले असता, त्या महिलेने त्यांनाच धमकी दिली. यानंतर पीयूष वसंत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.