यूथ वर्ल्ड आर्चरीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मिहीरचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:15+5:302021-08-19T04:38:15+5:30
सुवर्णपदक मिळविल्यानंतर बुलडाण्यात प्रथमच दाखल झाल्यानंतर त्याचे आ. संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीने ...
सुवर्णपदक मिळविल्यानंतर बुलडाण्यात प्रथमच दाखल झाल्यानंतर त्याचे आ. संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीने भावपूर्ण स्वागत करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौक ते निवासस्थान, अशी सजविलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. संजय गायकवाड, मिहीरचे आई-वडील, प्रशिक्षक चंद्रकांत इलग, विजूभाऊ वानखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांच्यासह बुलडाण्यातील मोठा जनसमुदाय या मिरवणुकीत सहभागी झाला होता.
भावुक झालो होतो
अमेरिकेवर कंपाउंड राउंडमध्ये मात केल्यानंतर भारताला सुवर्णपदक मिळाल्याची जाणीव होताच भावुक झालो होतो. नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेही सुचत नव्हते. माझ्या यशाचे श्रेय हे आई-वडील आणि प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे आहे. या यशाने भारावून न जाता सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावर भर राहील, असे मिहीर आपार याने यावेळी बोलताना सांगितले.
आर्चरी सेंटर कार्यान्वित करणार
बुलडाण्यात आर्चरी सेंटर त्वरेने उभे करण्यास आपण प्राधान्य देणार असून, त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, दिवाळीपर्यंत बुलडाण्यात आर्चरी सेंटर उभे राहील. या सेंटरमधूनच भविष्यातील सुवर्णपदक विजेते खेळाडू निर्माण होतील, अशी भावना आ. संजय गायकवाड यांनी मिहीरचा जयस्तंभ चौकात सत्कार करताना व्यक्त केली.