लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या काळात कोविड कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांना सर्वत्र कोविड योद्धा म्हणून 'मान' दिला जातो, मानधन केव्हा मिळणार असा प्रश्न या कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कोविड कर्मचाऱ्यांचे गेल्यास चार महिन्यापासूनचे वेतन रखडले आहे.कोरोना काळात काम करणाऱ्या कोविड योद्धांना मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. देशभरात जेव्हा कोरोनाचे आगमन झाले त्यावेळेस सर्व देशवासियांच्या मनात प्रचंड भीती होती. त्यावेळेस कोविड रुग्णालयात काम करण्यास कोणीही धजावत नव्हते, अश्या भयावय परिस्थितीत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात आली. स्वतःचा जीव धोक्यात घालून नाममात्र मानधनावर या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. मात्र आता चार महीने उलटून गेले असतानाही अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय, स्विपर आदी आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन वेळेवर देण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
ही तर कर्मचाऱ्यांची थट्टाजीवावर उदार होऊन कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मिळणारे मानधन तुटपुंजे आहे, परंतू तेही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित आरोग्य प्रशासनाकडून कोविड कर्मचाऱ्यांची थट्टाच केली जात आहे. मागील चार महिन्यांपासून कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.- अमोलकुमार गवई, जिल्हाध्यक्ष, कोविड कंत्राटी कर्मचारी संघटना, बुलडाणा.