विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (बुलढाणा): अवकाळी पाऊस, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचा दर्जा घसरला आहे. कापसाची बोंडे खुलली नसून कवळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चक्क ४५०० रुपये क्विंटलने कापसाची खरेदी करण्यात येत असून, ६५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गत पाच वर्षातील कापसाचा हा नीचांकी दर आहे.
२०२१-२२ मध्ये कापसाचे दर १२ ते १३ हजार रुपयांवर पोहोचले हाेते. २१-२२ मध्ये ७२०० ते ११,६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले होते. त्यामुळे २२-२३ वर्षामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली होती. २२-२३ मध्ये कापसाला ६२०० ते ९४०० रुपये भाव मिळाले. सरासरी दर ७८०० होते. २३-२४ मध्ये मात्र कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. व्यापारी फक्त ४५०० रुपयांपासून कापसाची खरेदी करीत आहेत. चांगल्या कापसाला ६५०० रुपये भाव मिळत आहे. शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले असले तरी एफएक्यूच्या अडचणीमुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याला प्राधान्य देतात. कापसाच्या दर्जाचे कारण सांगत व्यापारी अल्पभावात कापूस खरेदी करीत आहेत.
कापूस पडला काळा
जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. सतत चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस झाल्यामुळे कापूस भिजला. भिजलेला कापूस काही प्रमाणात काळा पडला आहे. तसेच कपाशीची झाडे खाली पडल्याने कापसात माती मिसळली आहे. यासोबतच कापसाची बोंडे खुलली नसून कवळी असल्यामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.
गत चार वर्षातील भाव
वर्ष दर सरासरी
- २०२० - २१ ४८०० ते ६२०० ५५००
- २०२१ - २२ ७२०० ते ११,६५० ९४००
- २०२२ - २३ ६२०० ते ९४०० ७८००
- २०२३ - २४ ४५०० ते ७१०० ५७००
ग्रामीण भागात ४८०० ते ६५०० रुपयांपर्यंत भाव आहेत. यावर्षी पावसामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे. तसेच कवळीमुळे भाव पडले आहेत. ४८०० रुपयांपासून कापसाची खरेदी करण्यात येत आहे. अनेक शेतकरी याच भावात कापसाची विक्री करीत आहेत.- विनोद बोंबटकार. व्यापारी, जळगाव जामोद
भाववाढीच्या अपेक्षेने १०६ टक्के पेरणीगत दोन वर्षांत कापसाला चांगले भाव मिळाले होते. कापसाचे भाव चांगले राहतील या अपेक्षेने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यावर्षी १०६ टक्के पेरणी केली. जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ५६०.०६ हेक्टर आहे, तर यावर्षी १ लाख ९४ हजार ९२९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून, केवळ ४५०० रुपये भाव मिळत आहे.
यावर्षी कापसाला कमी भाव मिळत आहे. अवकाळी पावसाने व बोंडअळीने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दर्जा नसलेल्या कापसाला फक्त ४५०० रुपयेच दर मिळत आहेत. शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन मदत करण्याची गरज आहे.- पुरुषोत्तम मेतकर, बाजारभाव अभ्यासक, खामगाव.