दु:खावर फुंकर घालणाऱ्यांच्या अडचणी कोण समजणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:31 AM2021-05-25T11:31:15+5:302021-05-25T11:31:34+5:30
Buldhana News : दु:खावर फुंकर घालणाऱ्यांच्या अडचणी कोण समजणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी नातेवाईकांकडून वाद घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत. जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांना वारंवार नातेवाईकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कोरोनाच्या कठीण काळात अनेकांच्या दुखावर फुंकर घालणाऱ्यांच्या अडचणी कोण समजणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
कोव्हीड-१९ सारख्या महामारीमध्ये आपल्य जिवाची बाजी लावुन कुटुंबाची पर्वा न करता कोरोना काळात शासकिय आरोग्य सेवा देण्याऱ्या कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा देत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक आरोग्य महीला कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करीत आहेत. वैद्यकिय अधिकाऱ्यांना मारहाण करुन शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
नुकतीच घडलेली नांदुरा येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. बेंडे यांना कोविड सेंटरवर २२ मे रोजीच्या सायंकाळी सुमारे ५ वाजेदरम्यान झालेली मारहाण ही घटना वैद्यकिय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निषेधार्थ आहे. या घटनेचा गांभिर्याने विचार करुन, या परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना बुलडाणा जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांवर तसेच कोविड सेंटरवर पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
कोविड रुग्णालयांवर तसेच कोविड सेंटरवर पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षा प्रदान करावी, कोविड काळात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देण्यात याव्यात, आरोग्य कर्मचाऱ्यांचा विचार करता परिस्थिती हाताबाहेर न जाता त्यावर आत्ताच नियोजन करुन या घटनांना आळा घालावा, आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
- अमोल गवई, जिल्हाध्यक्ष, कोविड कंत्राटी संघटना, बुलडाणा.