बुलडाणा : आयटीआय अर्थात तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. काही वर्षांपूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या; परंतु औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांची मागणी वाढल्यामुळे युवक-युवती आयटीआयकडे वळत आहेत. आयटीआय प्रवेशासाठी आता स्पर्धा वाढत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आयटीआयच्या चार हजार जागा आहेत. अद्याप आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेस अधिकृत सुरुवात झालेली नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गत काही वर्षांपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रात आयटीआय झालेल्या युवकांना मोठी मागणी आहे. तशा संधीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत विविध खासगी कंपन्या आयटीआय विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संधी देत आहेत. अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागच्या जागी रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थी आयटीआयला अधिक पसंती देत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था १३ असून, खासगी संस्था ९ आहेत. या २१ संस्थांमध्ये विविध शाखांच्या एकूण ४ हजार जागा उपलब्ध आहेत. अद्याप अधिकृत प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यावर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तिपटीने वाढण्याची शक्यता आहे.
सर्वांनाच हवा आहे फिटर !
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमामध्ये सर्वाधिक मागणी ही फिटरला आहे. औद्योगिक क्षेत्रात फिटरचे महत्त्व आहे. फिटर ही शाखा अष्टपैलू शाखा म्हणून ओळखली जाते.
दरवर्षी फिटर शाखेसाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश अर्ज करतात. या शाखेसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येते. फिटर ही रोजगाराभिमुख शाखा असल्याने प्रत्येकाला या शाखेत प्रवेश हवा असतो.
औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्येसुद्धा फिटर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची अधिक मागणी असते. फिटर हा कोणतेही काम करू शकतो. विविध कौशल्ये त्याच्या अंगी असतात.
फिटर शाखेनंतर इलेक्ट्रिशियन शाखेला माेठी मागणी आहे. फिटर शाखेला प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. येथे प्रवेशासाठी मोठी चढाओढ असते.
भविष्याच्या दृष्टिकोनातून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. ड्रेस मेकिंगसाठी अर्ज केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी किंवा स्वयंरोजगार करता येऊ शकतो.
- भारती इंगळे, विद्यार्थिनी
फिटर शाखेसाठी प्रवेश मिळावा, यासाठी अर्ज केला आहे़ सध्या शिक्षण घेऊनही नाेकरी मिळत नसल्याने काैशल्य शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा भर आहे़ त्यामुळे, आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची माेठी स्पर्धा आहे़
- प्रसेनजीत वानखडे, विद्यार्थी
विद्यार्थ्यांची आयटीआयला पसंती
गत काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची आयटीआयला पसंती मिळत आहे़ शिक्षण घेऊनही राेजगार मिळत नसल्याने अनेक काैशल्यावर आधारित शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे़ त्यामुळे, आयटीआय प्रवेशासाठीही स्पर्धा वाढली आहे़