भरधाव वाहनातून पडल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:16 AM2020-01-19T11:16:56+5:302020-01-19T11:16:59+5:30
अॅपेतून पडून एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चिखली बुलडाणा मार्गावरील सव फाट्याजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भरधाव जाणारा अॅपे गतिरोधकावर आदळल्याने अॅपेतून पडून एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चिखली बुलडाणा मार्गावरील सव फाट्याजवळ घडली. हा अपघात घडल्यानंतर अॅपे चालक घटना स्थळावरून फरार झाला होता.
चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा हे अमिना बी अमिन शहा (वय २७) या विवाहितेचे माहेर आहे. ही महिला त्यांची बहिण रुकसाना व चार मुलासह एका अॅपेमध्ये बसून सासरी मलकापूरकडे जात होती. चिखली ते बुलडाणा अॅपेने प्रवास करीत असताना सव नजीक असलेल्या रस्त्यावरील गतीरोधकावर भरधाव अॅपे आदळला. त्यामुळे अॅपेतील अमिना बी अमिन शहा ही महिला बाहेर फेकल्या गेली. या अपघातात तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून तिला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीला मृत घोषीत केले. दरम्यान अपघात घडताच अॅपेचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. प्रकरणी वृत्त लिहिपर्यत पोलिस स्टेशनला कुठलाच गुन्हा दाखल झाला नव्हता.
मोटार सायकल अपघातात तीन जखमी
साखरखेर्डा: लव्हाळा - हिवरा आश्रम रोडवर एका दुचाकीची व अज्ञात वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले असून एका युवकाचा पाय तुटून बाजूला पडला. तर दोघांच्या पायाला जबर मार लागला आहे. हा अपघात १७ जानेवारीला रात्री दरम्यान घडला. हिवरा आश्रम येथे यात्रेला तांदूळवाडी येथील तीन युवक दुचाकीने गेले होते. तेथून रात्री ९.३० वाजता साखरखेर्डा मार्ग तांदूळवाडी येथे जात असताना त्यांची दुचाकी आणि अज्ञात वाहनांची धडक झाली. त्या अपघात अक्षय शालीग्राम जाधव या २५ वर्षीय युवकांच्या पायाचा तुकडा पडला. दुचाकीवर मागे बसलेले प्रशांत माहादू जाधव, सचिन मोरे हे जखमी झाले. हिवरा आश्रम येथून साखरखेर्डा येथे शुभम राजपूत हे येत होते. त्यांनी तिघांनाही वाहनात टाकून साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. संदिप सुरुशे यांनी तातडीने उपचार करुन बुलडाणा येथे रेफर केले.
‘त्या’ दोघांवरही औरंगाबाद येथे उपचार सुरू
साखरखेर्डा ते लव्हाळा रोडच्या कडेला ११ जानेवारीला रात्री उशिरा दोन व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत परिवहन अधिकारी यांच्या लक्षात आले. त्या दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता साखरखेर्डा येथील शिक्षक वसंता नाईक, गोटू मुदमाळी हे गंभिर जखमी झालेले आढळून आले. त्यांच्यावर उपचार करुन औरंगाबाद येथे रेफर केले असून तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.