मेहकर : शहरातील बसस्थानकाचे काम सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी बसस्थानकाच्या मागील सोनाटी रस्त्यावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांकरिता ही सेवा एक डोकेदुखी ठरत आहे.
मेहकर बसस्थानकाच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामासाठी शासनाने तीन कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम रखडले असून, या कामाला सुरुवात झालेली नाही. नवीन बसस्थानकाचे काम सुरू व्हावे यासाठी महामंडळाने तात्पुरती पर्यायी जागा बसस्थानकाच्या मागे सोनाटी रस्त्यावर टीनशेड टाकून केली आहे. शनिवारपासून या ठिकाणावरून एसटी गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, या पर्यायी जागेत महामंडळाकडून प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध न केल्याने प्रवाशांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तसेच महिला, पुरुषांसाठी शौचालयाचीही व्यवस्था नाही. हा परिसर स्वच्छ न केल्याने सर्वत्र घाण पसरलेली दिसत आहे. महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केलेल्या जागेच्या समोरच मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू असून त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावर मोठा परिणाम हाेत आहे. वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकले नाही.