बस कुठे अडकली आधीच कळणार, मात्र ॲप लाँचिंगच लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:52+5:302021-08-24T04:38:52+5:30
गेल्या दोन वर्षांपासून महामंडळातर्फे राज्यातील प्रत्येक आगारात या प्रणालीचे काम सुरू आहे. महामंडळातर्फे राज्यभरात एकाच वेळी ही सिस्टम सुरू ...
गेल्या दोन वर्षांपासून महामंडळातर्फे राज्यातील प्रत्येक आगारात या प्रणालीचे काम सुरू आहे. महामंडळातर्फे राज्यभरात एकाच वेळी ही सिस्टम सुरू करण्याचे नियोजन आहे. काही आगारांमध्ये सिस्टमचे काम अपूर्ण असल्यामुळे, ही प्रणाली सुरू होण्यास विलंब होत असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
बस कुठे आहे, हे आधीच कळणार
‘व्हीटीएस’ सिस्टमद्वारे आगारातून निघालेली बस ताशी किती वेगाने धावते आहे, सध्या ती कुठल्या थांब्यावर आहे, पुढच्या थांब्यावर ती केव्हा पोहोचेल ही माहिती प्रवाशांना ‘व्हीटीएस’ ॲपद्वारे कळणार आहे. याप्रणालीसाठी बुलडाणा आगारात ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले असून, जिल्ह्यातील ४३१ बसला ‘व्हीटीएस’ सिस्टम लावण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्वच बसमध्ये यंत्रणा
जिल्ह्यातील सात आगारातील ४३१ बसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. या प्रणालीचा लाभ प्रवाशांसह कर्मचारी आणि अधिकारी यांनाही होईल. मात्र, सध्या या प्रणालीचे काम पूर्णत्वास गेले नसून, त्यामुळे ॲप्स लाँचिंग रखडली आहे. तरी येत्या काही काळात हे काम पूर्णत्वास जाणार आहे.
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
एसटी महामंडळातर्फे गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातील आगारांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टमचे कामकाज सुरू आहे. यंदा स्वातंत्र्य दिनापासून राज्यात एकाच वेळी ही सिस्टम सुरू करण्यात येणार होती. मात्र, इतर तांत्रिक कामे अपूर्ण असल्यामुळे १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला आहे. सध्या राज्यभरात व्हीटीएस प्रणालीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या महिनाभरात उर्वरित तांत्रिक कामेही पूर्ण होऊन, ही सिस्टम सुरू होणार असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात येत आहे.
‘व्हीटीएस’ प्रणालीचे काम बुलडाणा विभागात १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, या प्रणालीचे महामंडळाकडून ॲप विकसित न करण्यात आल्यामुळे या प्रणालीच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. जसे महामंडळाकडून ॲप विकसित होईल, तशी ही प्रणाली सुरू करण्यात येईल.
-संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा विभाग.