मण्यार जातीच्या सापांची जोडी पकडणे बेतले युवकाच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:19 PM2021-10-25T17:19:17+5:302021-10-25T17:19:48+5:30
Snake Bite : राजू वसंता महाले, असे मृतक युवकाचे नाव आहे़.
धामणगाव धाड : प्रशिक्षण नसताना विषारी साप पकडणे धामणगाव येथील २२ वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले़. या सापांनी दंश केल्याने या युवकाचा मृत्यू झाला. राजू वसंता महाले, असे मृतक युवकाचे नाव आहे़.
धामणगाव येथील राजू महाले या युवकाच्या घरासमाेर २४ ऑक्टाेबर राेजी रात्री १० वाजता मण्यार जातीच्या सापांची जाेडी आढळली. प्रणयक्रीडेत व्यस्त असलेल्या या जाेडीला त्याने पकडण्याचा प्रयत्न केला. साप पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसताना त्याने दाेन्ही सापांना पकडले. त्यामुळे त्याला सापांनी तब्बल १२ ठिकाणी चावा घेतला. त्यामुळे या युवकाच्या शरीरात विष पसरले. उपस्थित ग्रामस्थांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान २५ ऑक्टाेबर राेजी सकाळी त्याचा मृत्यू झाला़.
धाडस करणे भाेवले
राजू महाले याच्या घरासमाेर मण्यार साप आढळल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच तेथे ग्रामस्थांची माेठी गर्दी झाली हाेती. या गर्दीतून राजु महालेने प्रशिक्षण नसतानाही साप पकडण्याचा प्रयत्न केला़ दाेन्ही साप त्याने हातात पकडले़ यावेळी सापांनी त्याला १२ ठिकाणी चावा घेतला़ अतिशय विषारी असलेल्या मण्यार सापांनी चावा घेतल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले़ मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़