पार्टीसाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:41 AM2020-05-21T10:41:18+5:302020-05-21T10:41:25+5:30
खामगाव येथील निळकंठ नगरातील दीपक शर्मा (३७) हा युवक आंघोळीसाठी विहिरीत उतरला
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: लॉकडाउनमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थिती दर्शविणे खामगाव येथील एका युवकाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री चिखली बु. शिवारात घडली.
खामगाव येथील रहीवासी असलेल्या काहींनी मित्राच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टी ठेवली. चिखली बु. शिवारातील विठ्ठल लाहुडकार यांच्या शेतात १४-१५ जण पार्टीसाठी जमले. दरम्यान, खामगाव येथील निळकंठ नगरातील दीपक शर्मा (३७) हा युवक आंघोळीसाठी विहिरीत उतरला. बराच वेळानंतरही तो परत न आल्याने उपस्थितांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. जलंब पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर दीपकच्या शोधार्थ माटरगाव येथील पट्टीचे पोहणारे प्रकाश खवले, संतोष धोटे यांना पाचारण करण्यात आले. बऱ्याच वेळानंतर दीपकचा मृतदेह विहिरीत सापडला. यावेळी ठाणेदार पी. आर. इंगळे, एएसआय राजेंद्र देशमुख, विनोद राठोड, राजू तायडे, पोलिस पाटील सुनील खडसे, अनंता शिंदे उपस्थित होते.
याप्रकरणी दीपक सोबत पार्टीसाठी गेलेले त्याचे नातेवाईक प्रशांत शंकर शर्मा यांनी जलंब पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.
पार्टीसाठी जमलेल्यांविरोधात गुन्हा !
कोविड-१९ या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागून करण्यात आली आहे. कोविड विषाणू संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, याकरीता शासन वेळोवेळी करीत असलेल्या नियमांचे पालन न करता, कोणत्याही परवानगी शिवाय केवळ वाढदिवस पार्टी करीता एकत्र जमणाºयो १४ जणांविरुद्ध पोस्टे जलंब येथे नियमांचे उल्लंघन बाबत गुन्हा नोंद सुद्धा करण्यात आला आहे.