जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक असलेले वॉरन बफे (warren buffett) हे देणगी देण्याच्या बाबतीतही आघाडीवर असतात. 94 वर्षीय बफे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी चार धर्मादाय संस्थांना अथवा चॅरिटी फाउंडेशन्सना 1.1 अब्ज डॉलर्स अथवा सुमारे 10,000 कोटी रुपये दान केले आहेत. याचबरोबर त्यांनी आपल्या ताज्या नोटमध्ये, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अब्जावधीच्या संपत्तीचे काय होईल आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? हेदेखील सांगितले आहे.
चॅरिटीसाठी दान केले 10000 कोटी रुपये -
जगातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे यांचा जगातील सर्वात श्रीमंत 10 अब्जाधीशांच्या यादीत समावेश आहे. गेल्या 25 नोव्हेंबर रोजी, बफे कुटुंबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या चार फाउंडेशन्सना मोठी देणगी देण्यात आली आहे. अहवालानुसार, त्यांनी बर्कशायर हॅथवेचे 1.1 अब्ज डॉलर्स अथवा सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे शेअर्स दान केले आहेत. शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी, एका शेअरची किंमत $ 478.56 (सुमारे 40,372 रुपये) वर बंद झाली होती.
या मोठ्या देणगीसोबतच वॉरेन बफे यांनी कंपनीच्या शेअरहोल्डर्सना एक नोटही लिहिली आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर अब्जावधींच्या संपत्तीच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भात अथवा वारसासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. यात बर्कशायर हॅथवेचे 1,600 क्लास-ए शेअर्स 24 लाख क्लास-बी शेअर्समध्ये रूपांतरित केले जातील आणि ते चारही फॅमिली फाउंडेशन्समध्ये वितरीत केले जातील, असे घोषित केले आहे.
वॉरन बफे यांनी आपल्या पत्रात या वितरणाबाबत आकडेवारीसह स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले, त्यांची दिवंगत पत्नी सुझी यांच्या नावाने असलेल्या सुसान थॉम्पसन बफेट फाऊंडेशनला (1,500,000 शेअर्स), तर त्यांच्या मुलांच्या फाउंडेशनला यानुसार शेअर्स दिले जावेत, शेरवुड फाउंडेशनला 300,000 शेयर, हॉवर्ड जी. बफेट फाउंडेशनला 300,000 शेअर, नोव्हो फाउंडेशनला 300,000 शेअर. 2004 मध्ये बफे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.
अब्जाधीश वॉरेन बफे हे जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलर्स एवढी आहे.