Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य

Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य

Ratan Tata News : एका कुटुंबाचा उद्योग या प्रतिमेतून जागतिक दर्जाचे व्यवसाय साम्राज्य अशी त्यांनी टाटा समुहाची ओळख निर्माण केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:41 AM2024-10-10T00:41:24+5:302024-10-10T00:41:56+5:30

Ratan Tata News : एका कुटुंबाचा उद्योग या प्रतिमेतून जागतिक दर्जाचे व्यवसाय साम्राज्य अशी त्यांनी टाटा समुहाची ओळख निर्माण केली.

A familys industry to countrys faith Ratan Tata built a worlds biggest business empire | Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य

Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रख्यात उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान टाटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.

८६ वर्षीय रतन टाटा यांना सोमवारी पहाटे वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृद्धपकाळाने होणाऱ्या व्याधीच्या आजारपणावरील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते होते. त्यानंतर त्यांच्या आजारावरील निदानाकरीता गेले दोन दिवस वैद्यकीय चाचण्या सुरु होत्या. बुधवारी मात्र त्यांची अचानक तब्ब्येत ढासळल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील विविध वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात येत होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सुरुवातीला रक्तदाबाचा त्रास होता. मात्र त्यानंतर त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये कोणत्याही विशेष आजाराचे निदान झाले नव्हते. मात्र त्यानंतर काही कालावधीने त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर बुधवारी रात्री ते उपचाराला कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे कळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन दशके अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य!

 जेआरडी टाटा यांच्याकडून जेव्हा रतन टाटा यांनी व्यवसायाची सूत्रे स्वीकारली त्यानंंतर विश्वास या शब्दाशी एकरुप झालेला त्यांचा व्यवसाय पुढे तसाच जोपासणे आणि प्रत्येक दशकात भारतात होणाऱ्या नव्या घडामोडींचा वेध घेत त्या अनुषंगाने व्यवसाय विस्तार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. एका कुटुंबाचा उद्योग या प्रतिमेतून जागतिक दर्जाचे व्यवसाय साम्राज्य अशी त्यांनी टाटा समुहाची ओळख निर्माण केली.

मूल्याधारित व्यवसाय हे सूत्र त्यांनी तंतोतंत जोपासले. संयत व नम्र व्यावसायिक ही त्यांची छबी कायमच जनमानसाच्या मनावर कोरली गेली आहे.  १९३७ साली जन्म झालेल्या रतन टाटा यांचे बालपण संघर्षाचे ठरले. ते १० वर्षांचे असताना त्यांचे माता-पिता वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या आजीने वाढवले. वास्तुविशारद आणि स्ट्रक्चरल इंजीनियरिंग या विषयात अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंट विषयाचे शिक्षण घेतले. त्यावेळी संगणक क्षेत्रात जागतिक पातळीवर दिग्गज कंपनी आयबीएमने नोकरीसाठी बोलावले होते. मात्र, त्याला नकार देत त्यांनी १९६२ टेल्को (आताची टाटा मोटर्स) या कंपनीत शॉप फ्लोअर या अत्यंत तळाच्या पदावरून कामाला सुरुवात केली.

आपल्या व्यवसायाची बारीकसारीक माहिती करून घेत त्यांनी टाटामधील आपल्या कामगिरीची सुरुवात केली. त्यानंतर टाटा समुहातील कंपन्यांतील विविध विभागांत त्यांनी विविध पदांवर काम केले. उमेदवारीची अशी ९ वर्षे काम केल्यानंतर १९७१ साली ते सर्वप्रथम टाटा समुहाच्या नॅशनल रेडियो अँड इलेक्ट्रॉनिक्स (नेल्को) या कंपनीत सर्वप्रथम संचालक झाले.  १९९१ पर्यंत त्यांनी जेआरडी टाटा यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समुहातील विविध कंपन्यांची जबाबदारी सांभाळली. १९९१ साली जेआरडी टाटा यांच्याकडून त्यांनी टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ज्यावर्षी रतन टाटा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली त्याचवर्षी भारतीय अर्थव्यवस्थेने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. भारतातल्या आणि जगातल्या उद्योजगकांना एक मोठी बाजारपेठ खुली झाली.

नव्याने समोर आलेल्या बाजारपेठा, त्यांची गरज हे एकीकडे करतानाच दुसरीकडे आपल्याकडे येणारे आंतरराष्ट्रीय उद्योग आणि त्यांच्यामुळे आपल्या देशात उभी राहणारी व्यावसायिक आव्हाने असा दुहेरी वेध घेत व्यवसाय विस्ताराचे मोठे आव्हान त्यांनी स्वीकारले. टेटली, कोरस जॅग्वार लँड रोव्हर, बर्नर मोन्ड, जनरल केमिकल इंडस्ट्रीजय प्रॉडक्ट, देवू अशा आंतरराष्ट्रीय विख्यात ब्रँडमध्ये त्यांनी गुंतवणूक करत त्यांना आपल्या पंखाखाली घेतले. १०० पेक्षा जास्त देशांत त्यांनी व्यवसाय विस्तार केला. आज मिठापासून गाड्यांपर्यंत टाटा समुहाच्या कंपन्यांचा विस्तार झाला आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसात असे एक तरी उत्पादन आहे जे टाटाने निर्माण केले आहे. या निर्मितीचे निर्विवाद श्रेय जाते ते रतन टाटा यांना.

Web Title: A familys industry to countrys faith Ratan Tata built a worlds biggest business empire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.