जगात आता नव्या युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेने भारतासह चीनसारख्या देशांवर रेसिप्रोकल टेरिफ लादल्यानंतर आता चीननेडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. चीनच्या अर्थमंत्रालयाने अमेरिकेच्या आयात वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के अतिरिक्त टेरिफ लादत असल्याची घोषणा केली आहे. तसेच अमेरिकेला हे दिलेले प्रत्यूत्तर असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेने त्यांच्या देशात आयात होणाऱ्या सर्व चिनी वस्तूंवर परस्पर शुल्क लादले आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात काम केले आहे, जे आमच्या कायदेशीर अधिकारांना हानीकारक आहे. जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळीला धोका निर्माण करू शकेल अशी ही धमकी आहे, असे चीनने म्हटले आहे. अमेरिकेने वाटाघाटीद्वारे त्यांचे एकतर्फी शुल्क काढून टाकावेत, जेणेकरून सर्व व्यापारातील फरक दूर करता येतील, असेही चीनने म्हटले आहे.
एवढेच नाही तर चीनने दुर्मिळ धातूंच्या निर्यातीवरही नियंत्रण आणणार असल्याचे म्हटले आहे. समेरियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोशिअम, ल्युटेटियम, स्कँडियम आणि यट्रियम सारखे हे धातू आहेत, जे चीन अमेरिकेला पुरवत असतो. त्याचा पुरवठाच कमी केला जाणार आहे. जेणेकरून अमेरिकेला गुढग्यावर आणता येणार आहे.
ट्रम्पनी दोनदा कर लादला...
ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी वस्तूंवर आधीच २०% कर लादला होता. २ एप्रिल रोजी त्यांनी पुन्हा चीनवर ३४% चा परस्पर कर लादला आहे. आता हा कर एकूण ५४ टक्के होत आहे. ज्या देशांसोबतच्या व्यापारात अमेरिकेला सर्वाधिक नुकसान होत आहे, त्यात चीन, युरोपियन यूनियन, मेक्सिको, व्हिएतनाम, आयर्लंड, जर्मनी, तैवान, जापान, दक्षिण कोरिया, भारत, थायलंड, इटली, स्वित्झर्लंड, मलेशिया आणि इंडोनिया हे देश आहेत.