Adani Group Stocks: काही दिवसांपूर्वी गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यासह काही जणांवर अमेरिकेच्या न्यायालयात लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. परंतु एका वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज पुन्हा तेजी दिसून येत आहे. कामकाजादरम्यान अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा (AGEL) शेअर २.४७ टक्क्यांनी वधारून ९२०.७५ रुपयांवर पोहोचला. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ३.३९ टक्क्यांनी वधारून २,२२३.४० रुपयांवर तर अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर ५.९५ टक्क्यांनी वधारून ६३६.५० रुपयांवर पोहोचला.
तर दुसरीकडे अदानी टोटल गॅस लिमिटेड ४.५४ टक्के, अदानी पोर्ट्स १.४६ टक्के, अदानी विल्मर २.२६ टक्के, अंबुजा सिमेंट्स १.२० टक्के, अदानी पॉवर ५.२९ टक्के, सांघी इंडस्ट्रीज १.१५ टक्के, एसीसी १.२७ टक्के आणि एनडीटीव्ही ३.०५ टक्क्यांनी वधारले.
का आली तेजी?
अदानी समूहाच्या शेअर्समधील तेजी हे एक अपडेट आहे ज्यामध्ये गौतम अदानी, सागर अदानी यांची लाच प्रकरणात एफसीपीए आरोपांमध्ये नावं नाहीत, असा दावा अदानी ग्रीननं केला आहे. तर दुसरीकडे माजी एजी मुकुल रोहतगी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "१ आणि ५ नंबर बाकींपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. परंतु यामध्ये गौतम अदानी किंवा त्यांच्या पुतण्यावर कोणतेही आरोप नाहीत. १ नंबर गौतम अदानी आणि सागर अदानी यांना सोडून अन्य लोकांविरोधात आहेत. केवळ एज्योर आणि सीडीपीक्यू अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
मूडीजचं रेटिंग घटलं
रेटिंग एजन्सी मूडीजने मंगळवारी त्यांनी अदानीच्या सात कंपन्यांचं रेटिंग 'स्थिर' वरून 'नकारात्मक' केलं असल्याची माहिती दिली. मूडीजनं यासाठी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि इतरांवर लाच दिल्याचा आरोपाचं कारण दिलं आहे. त्याचबरोबर फिच रेटिंग्जनं समूहातील काही बॉन्ड्स नकारात्मक रेटिंग खाली ठेवलेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)