Bonus Shares : दिवाळीपूर्वी शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी, विशेषत: मारुती सुझुकीची होल्डिंग कंपनी भारत सीट्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सीट्स लिमिटेड आपल्या भागधारकांना बोनस देण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
५५० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या भारत सीट्स लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत केवळ सप्टेंबर तिमाहीचे निकालच जाहीर केले जाणार नाहीत, तर कंपनी बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणाही करू शकते. बोनस शेअर्स जारी करण्याची तारीख काय असेल, हेही या बैठकीनंतरच समोर येईल.
भारत सीट्स लिमिटेड १७ वर्षांनंतर आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देणार आहे. यापूर्वी २००७ मध्ये कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स दिले होते, तेव्हा कंपनीनं एका शेअरवर एक शेअर मोफत दिला होता.
काय करते कंपनी?
मारुती सुझुकी इंडिया ही भारत सीट्स लिमिटेडची प्रवर्तक कंपनी आहे. या कंपनीत मारुती सुझुकीचा १४.८१ टक्के हिस्सा आहे, तर सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचाही १४.८१ टक्के हिस्सा आहे. एनडीआर ऑटो कंपोनेंट्स या आणखी एका लिस्टेड कंपनीचाही यात २८.६६ टक्के हिस्सा आहे. भारत सीट्स लिमिटेड हा रोहित रेलन असोसिएट्स, मारुती उद्योग आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचा संयुक्त उपक्रम आहे.
भारत सीट्स कार, मोटारसायकल आणि भारतीय रेल्वेसाठी सीटिंग सिस्टम, एनव्हीएच कम्पोनंट्स आणि बॉडी सीलिंग पार्ट्स तयार करते. मंगळवारी हा शेअर ७ टक्क्यांनी वधारून १७५.७ रुपयांवर बंद झाला. तर, गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून १९१ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)