Gautam Adani News : माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यापाठोपाठ राज्यसभेचे माजी खासदार आणि वकील महेश जेठमलानी हेदेखील अदानी समूह आणि समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या बचावासाठी मैदानात उतरलेत. "अमेरिकेत अदानी समूहावर करण्यात आलेले आरोप हे भारताच्या आर्थिक विकासाचा प्रवास रोखण्याचं षड्यंत्र आहे," असं जेठमलानी म्हणाले. "काँग्रेस केवळ राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा उपस्थित करत आहे. अदानी समूहाविरोधात जेपीसीची मागणी करण्यापूर्वी विरोधकांनी विश्वासार्ह पुरावे द्यावेत," असंही त्यांनी नमूद केलं.
"भारतातील लाचखोरीबाबत अमेरिकेच्या न्याय खात्याच्या आरोपपत्रात कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. भारतात कोणत्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे, हेदेखील आरोपपत्रात म्हटलेलं नाही," असं जेठमलानी म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना महेश जेठमलानी यांनी विरोधी पक्ष याबाबत जो आवाज उठवत आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. सौरऊर्जेशी संबंधित कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा पुरावा काय? अमेरिकेच्या न्याय खात्याच्या दोषारोपपत्रात असं काहीही म्हटलेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरोपांवर डोळे बंद करून विश्वास
"भारतातील या समूहाच्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांवर पक्ष डोळे झाकून विश्वास ठेवत आहे. हे भारताच्या हिताचं नाही. अमेरिकन न्यायालयाच्या आरोपावर भरवसा केला जाऊ नये, त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. इतकंच नाही, तर अदानी किंवा बॉन्ड जारी करणाऱ्या कंपनी अदानी ग्रीननं भारतात कोणतंही चुकीचं काम केलंय हेदेखील सांगितलेलं नाही," काँग्रेसवर टीका करताना जेठमलानी म्हणाले. आरोपपत्र जारी करणाऱ्या अमेरिकन न्यायाधीशांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे अशा प्रकारच्या कारवाईच्या आधारे कारवाई केली, हे आपल्याला समजत नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकासरथ रोखण्याचं षडयंत्र
काँग्रेस राजकीय फायद्यासाठी या मुद्द्याला खतपाणी घालत आहे आणि भारताचा विकासरथ रोखण्याचं हे षड्यंत्र आहे. तुम्ही एका कॉर्पोरेट ग्रुपच्या मागे आहात आणि पंतप्रधानांचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहात. ते (गौतम अदानी) एक उद्योगपती आहेत ज्यांनी भारत आणि परदेशात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत, ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असं जेठमलानी म्हणाले. अमेरिकेच्या आरोपानंतर गौतम अदानी यांच्यावर टीका करण्याची घाई करू नका.
भारताची आर्थिक वाढ रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या परकीय शक्तीच्या स्थानिक एजंटप्रमाणे तुम्ही वागत आहात. अप्रत्यक्षपणे तुम्ही किरकोळ गुंतवणूकदारांचं नुकसान करत आहात, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
जोपर्यंत काँग्रेस ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करत नाही, तोपर्यंत भारतातील कोणत्याही प्राधिकरण किंवा संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची गरज नाही. तुम्ही पुरावे सादर करा, तुम्हाला फक्त एक प्रकारचा आवाज उठवायचा आहे आणि संसदेत व्यत्यय आणायचा आहे, जे अजिबात योग्य नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.