Bajaj Housing Finance shares: बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे शेअर्स लिस्टिंगनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शेअरहोल्डर लॉक-इन पीरिअडचा आणखी एक टप्पा गुरुवारी १२ डिसेंबर रोजी संपत असल्यानं ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्स फोकसमध्ये असतील. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा शेअर आज इंट्राडे तब्बल २ टक्क्यांनी वधारून १४१.७५ रुपयांवर पोहोचला.
लिस्टिंगनंतर मोठी वाढ होती. परंतु नंतर त्यात घसरण दिसून आली. आता पुन्हा त्यात थोडी तेजी दिसून येतेय. दरम्यान, लिस्टिंग झाल्यानंतर काही दिवसांतच हा शेअर दुपटीनं वाढून १८८ रुपयांवर पोहोचला होता. आता शेअर उच्चांकी पातळीपेक्षा २५ टक्क्यांनी खाली आला आहे. या शेअरनं नुकताच १२५ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला. मात्र, आता शेअर त्या पातळीवरून थोडा सावरला आहे. कंपनीचे शेअर्स १६ सप्टेंबर रोजी लिस्ट झाले होते. या शेअरने १८ सप्टेंबर रोजी १८८.४५ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. ७० रुपयांच्या आयपीओ मूल्यावरून आता तो १७० टक्क्यांनी वधारला होता.
अधिक माहिती काय?
लॉक-इन कालावधी संपल्यानंतर बजाज हाऊसिंग फायनान्सचे १२.६ कोटी शेअर्स म्हणजेच इक्विटीच्या २ टक्के शेअर्स ट्रेडिंगसाठी फ्री केले जातील. लॉक-इन कालावधी संपल्याचा अर्थ असा नाही की सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील, परंतु केवळ ट्रेडिंगसाठी मोकळे केले जातील. बजाज हाऊसिंग फायनान्सचं स्थान २०२४ च्या यशस्वी आयपीओमध्ये येतं. ६,५६० कोटी रुपयांचा इश्यू जवळपास ६७ पट सब्सक्राइब झाला होता.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)