Bajaj Steel Industries: बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स पुढील आठवड्यात फोकसमध्ये असतील. गुरुवारी कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ३,२९४.०५ रुपयांवर बंद झाला. बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडनं ३ ऑक्टोबर रोजी १:३ बोनस जारी करण्याची शिफारस केली होती. त्यासाठी १२ नोव्हेंबर ही विक्रमी तारीख निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच कंपनी रेकॉर्ड डेटला प्रत्येकी तीन शेअर्स मोफत देत आहे.
बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सनं गेल्या ६ महिन्यांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या काळात शेअरमध्ये १५३ टक्के वाढ झाली असून आता कंपनी दिवाळीनंतर बोनस शेअर देण्याच्या तयारीत आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडने १२ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,७१२.९१ कोटी रुपये आहे. याचा आरओई २४.३८ आणि पीई २१.३४ आहे.
काय म्हणाली कंपनी?
बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडने २९ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या ईजीएममध्ये भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर, बोनस वाटप शेअर समितीनं मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४ ही तारीख निश्चित केली असल्याचं म्हटलं आहे.
बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं वर्षभरात २११ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत १९०% पर्यंत परतावा दिला आहे. गेल्या २ वर्षात शेअरमध्ये २५० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर गेल्या ५ वर्षात २७०० टक्क्यांनी वाढला आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)