निवडणुकीपूर्वी बँक कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांना पगारवाढीची भेट मिळाली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यांनी शुक्रवारी प्रलंबित असलेल्या या करारावर स्वाक्षरी केली. याशिवाय आठवड्यातून पाच दिवस कामकाजाचही आयबीएनं स्वीकार केला आहे.
आता हा निर्णय सरकारकडे पाठवला जाईल. यावर सहा महिन्यांच्या आत निर्णय घेतला जाणार आहे. वेतन वाढीसह अन्य सुविधा तात्काळ प्रभावानं लागू होणार आहेत. रजा, पगारवाढ यासह अनेक मागण्यांबाबत बँकिंग संघटनेची आयबीएशी दीर्घकाळ चर्चा सुरू होती, मात्र अंतिम करार होऊ शकला नाही. मात्र शुक्रवारी आयबीएनं बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून सामंजस्य करार केला.
या करारामुळे आठवड्यातून पाच दिवस बँकिंगचा मार्ग मोकळा झाला. सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. आता आयबीएनं महिन्यातील सर्व शनिवारी बँकांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. या बदल्यात बँकिंग कामकाज सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी ९.५० ते सायंकाळी ५.३० या वेळेत करण्याचा प्रस्ताव आहे. आयबीए सरकारला शिफारसी पाठवेल, ज्यावर ६ महिन्यांत अंतिम निर्णय घेतला जाईल.
१७ टक्क्यांची पगारवाढ
पगारवाढीच्या करारानंतर बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांना एकूण १२९४९ कोटी रुपये पगार म्हणून अधिक मिळतील. मूळ वेतन दीड पटीनं वाढलं आहे. साधारणत: एका क्लर्कचं वेतन ७ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये होईल, तर अधिकाऱ्याला १३ हजार ते ५० हजार रुपये वेतनवाढ मिळेल.
सुट्ट्यांमध्येही बदल
- अर्ध्या दिवसाची कॅज्युअल सुट्टी मिळेल.
- प्रमाणपत्राशिवाय महिलांना महिन्यातून एक दिवस वैद्यकीय रजा
- स्पेशल चाईल्ड असलेल्या दांपत्यांना ३० दिवसांची विशेष रजा. मेडिकल सर्टिफिकेटची गरज नाही.
- ५८ वर्षांच्या वरील कर्मचाऱ्यांना पत्नीच्या आजारासाठी त्यांच्य मेडिकल सर्टिफिकेटवर रजा.
- सुट्टांचं इनकॅशमेंट २४० दिवसांवरुन वाढवून २५५ दिवस करण्यात आलंय.
आयबीएसोबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे क्लर्कच्या पगारात ७ ते ३० हजार रुपयांनी तर अधिकाऱ्यांच्या पगारात १३ ते ५० हजार रुपयांची वाढ होणार आहे. आयबीएनं आठवड्यातून पाच दिवस बँकिंगचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तो शासनाकडे पाठविला जाईल, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सहसचिव रजनीश गुप्ता यांनी दिली.
या बँकांच्या कर्मचाऱ्यांना फायदा
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- कॅनरा बँक
- सेंट्रल बँक
- इंडियन बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- पंजाब आणि सिंध बँक
- पंजाब नॅशनल बँक
- यूको बँक
- युनियन बँक
- फेडरल बँक
- कर्नाटक बँक
- जम्मू आणि काश्मीर बँक
- दक्षिण भारतीय बँक
- करूर वैश्य बँक
- आरबीएल बँक
- नैनिताल बँक
- कोटक महिंद्रा
- धनलक्ष्मी बँक
- आयडीबीआय बँक