Join us

2000Rs Note withdrawal : ₹२ हजारांची नोट आता नुसता कागदाचा तुकडा राहणार का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 8:15 PM

पॅनिक होऊ नका. एका वेळी किती नोटा बदलता येणार? कधीपासून नोटा बदलता येणार? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. 

जर तुमच्याकडे २ हजारांची नोट असेल तर त्याचं काय करावं लागेल? आपल्याकडे असलेली ही नोट केवळ आता कागदाचा तुकडाच आहे का? अशा प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ.

माझ्याकडे २ हजारांची नोट आहे, आता ती चालणार नाही का?

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार २ हजारांची नोट आताही चलनात आहे. परंतु रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना या नोटा बदलण्यासाठी मुदत दिलीये. तुम्ही बँकेत जाऊन २००० हजारांच्या नोटेला १००, २००, ५०० रुपयांमध्ये बदलून घेऊ शकता.

केव्हापासून नोटा बदलता येणार?

२३ मे पासून तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन या नोटा बदलू शकता.

केव्हापर्यंत या नोटा बदलता येणार?

आरबीआयनं ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि बदलण्याची मुदत दिली आहे. याचा अर्थ तुम्ही आपल्या बँकेच्या ब्रान्चमध्ये जाऊन नोटा बदलू शकता. तुमच्याकडे ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत असल्यानं सध्या पॅनिक होण्याची गरज नाही.

एका वेळी किती रक्कम बदलू शकता?

तुम्हाला एका वेळेला केवळ २० हजारा रूपये मूल्याच्या नोटा बदलता येणार आहेत. याचा अर्थ २००० रुपयांच्या नोटेच्या १० नोटा तुम्हाला एका वेळी बदलता येतील.

बँकांना काय सांगण्यात आलंय?

आरबीआयनं बँकांना तात्काळ प्रभावानं २ हजारांच्या नोटा ग्राहकांना देणं बंद करण्यास सांगितलंय. परंतु ३० सप्टेंबरनंतर २ हजारांची नोट वैध असेल की नाही याबाबत रिझर्व्ह बँकेनं कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, ५०० आणि १ हजारांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांच्या नोटा पहिल्यांदा जारी करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकसरकारबँक