ग्राहकांनी त्यांच्या वारसांचं नॉमिनी करावं आणि त्यांना याची माहिती द्यावी असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी बँका आणि वित्तीय संस्थांना सांगितलं. यामुळे कोणताही दावा नसलेल्या डिपॉझिटच्या (अनक्लेम्ड डिपॉझिट) समस्येचा सामना करण्यास मदत मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित केलं.
"जेव्हा ग्राहकाच्या पैशांचे व्यवहार होतात तेव्हा बँकिंग सिस्टम, स्टॉक मार्केटसह सर्व फायनान्शिअल इकोसिस्टम्सनी ग्राहकांच्या भविष्याचाही विचार केला पाहिजे. ग्राहक त्यांचे नॉमिनी आणि त्यांचा पत्ता देतील याची खात्री पटवली पाहिजे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. नुकतेच रिझर्व्ह बँकेनं अनक्लेम्ड डिपॉझिटबाबत UDGAM पोर्टल लाँच केलंय.
रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत, दावा न केलेली रक्कम म्हणजेच बँकांमध्ये असलेल्या अनक्लेम्ड ठेवी ४८,२६२ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. सर्व वित्तीय संस्थांमध्ये दावा न केलेल्या रकमेचं मूल्य 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. टॅक्स हेवन देश (ज्या देशांत पैसे जमा केल्यावर मोठ्या प्रमाणात कर सवलत मिळते) आणि पैशाचे राउंड ट्रिपिंग (व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी बनावट व्यवहार दाखवणं) जबाबदार आर्थिक इकोसिस्टमला धोका असल्याचंही सीतारामन म्हणाल्या.
वित्तीय प्रणाली आवश्यकसायबर धोके, क्रिप्टो नियम आणि कर चुकवेगिरी यांसह अनेक आर्थिक धोक्यांना सामोरे जाण्यासाठी वित्तीय प्रणाली आवश्यक आहे. भविष्यातील आर्थिक अनिश्चिततेचा सामना करणारी आणि आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करणारी आर्थिक व्यवस्था असायला हवी, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. सीतारामन यांनी जागतिक नेत्यांना एक जबाबदार आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहकार्या वाढवण्याचं आवाहन केलं.
सायबर धोके वाढलेआजकाल सायबर धोक्यांचा आवाका खूप वाढला असल्याचं सीतारामन यांनी नमूद केलं. डिमॅट खात्यांची संख्या २०१९-२० मध्ये ४.१ कोटींवरून २०२२-२३ मध्ये १० कोटी झाली असल्याचं फिनटेक कंपन्यांच्या कामाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं. फिनटेक कंपन्यांना ग्राहकांचे तपशील आणि आर्थिक व्यवहारांचं संरक्षण करण्यासाठी एन्क्रिप्शन आणि इतर उपायांचा वापर करून मजबूत सुरक्षा उपायांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सांगितलं.
काय आहे UDGAM पोर्टलसामान्य लोकांना अनक्लेम्ड डिपॉझिट शोधण्यात मदत व्हावी यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं UDGAM नावाचं सेंट्रलाईज्ड वेब पोर्टल सुरू केलंय. याला भेट देऊन कोणतीही व्यक्ती बँकांमधील अनक्लेम्ड डिपॉझिट्सची माहिती घेऊ शकते. या पोर्टलच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या अनक्लेम्ड डिपॉझिट्सना शोधण्यास मदत होणार आहे. UDGAM हे वेब पोर्टल १७ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलंय.