काही दिवसांपासून ५०० रुपयांच्या नोटेबाबत सोशल मीडियावर एक अफवा परसली. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेलाही पुढे यावं लागलं. 'स्टार' चिन्ह (*) असलेल्या नोटच्या वैधतेबाबत सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात असलेल्या सर्व शंका रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावल्या आहेत. जर तुम्हाला सीरिजच्या मध्यभागी स्टार असलेली अशी कोणतीही बँक नोट मिळाली असेल, तर ही नोट देखील इतर नोटांप्रमाणे वैध असल्याचं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेनं दिलंय.
चुकीच्या पद्धतीनं छापलेल्या नोटांच्या जागी जारी केल्या जाणाऱ्या नोटेवरील नंबर पॅनेलमध्ये स्टार चिन्ह जोडण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलेय. हे स्टार चिन्ह पाहून काही लोकांनी त्याची तुलना ५०० रुपयांच्या नोटेशी केली आणि ती अवैध किंवा बनावट असल्याचं म्हटलं. यानंतर रिझर्व्ह बँकेनं याची दखल घेत ही माहिती दिलीये. सीरिअल नंबर असलेल्या नोटांच्या बंडलमध्ये चुकीच्या पद्धतीनं छापलेल्या नोटांऐवजी तारांकित चिन्ह असलेल्या नोटा दिल्या जातात. हा स्टार नोटेचा नंबर आणि त्यात असलेल्या अक्षरांच्या मध्ये असतो, असंही सांगण्यात आलंय.
याचा अर्थ कायरिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं की स्टार चिन्ह असलेली बँक नोट ही इतर कायदेशीर नोटांप्रमाणेच आहे. त्यावरील स्टारचं चिन्ह फक्त हे दर्शवते की ते बदललेल्या किंवा पुन्गा प्रिन्ट केलेल्या नोटेच्या जागी जारी करण्यात आलेले आहे. नोटांची छपाई सुलभ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी स्टार नोटचा ट्रेंड २००६ मध्ये सुरू झाला होता. यापूर्वी रिझव्र्ह बँक चुकीच्या छापील नोटा बदलून त्याच क्रमांकाच्या योग्य नोटा देत असे.