आजकाल बरेच लोक क्रेडिट कार्डाचा वापर करतात. अलीकडच्या काळात क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या एजन्सींनीही क्रेडिट कार्डाची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अनेक कंपन्या त्यांचे युझर्स वाढवण्यासाठी त्यांच्या क्रेडिट कार्डवर अनेक आकर्षक ऑफर देखील देतात. अशा परिस्थितीत अनेकांना ऑफर्सचा विचार करून एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड मिळतात. इतकंच नाही तर काही लोक गरज नसतानाही क्रेडिट कार्ड घेतात.तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील, तर तुमच्या मनात कधी ना कधी क्रेडिट कार्ड वापरलं नाही तर नुकसान होऊ शकतं का? असा प्रश्न आला असेल. आज आपण जाणून घेऊ की तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत नसल्यास काय होऊ शकतं.वापर नसेल तर काय कराल?तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल ज्यावर अॅन्युअल फी शून्य असेल, तर तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करू नये. मग ते तुम्ही वापरा किंवा नाही. जर अॅन्युअल फी असेल आणि तुम्ही ते वापरत नसाल तर प्रथम कार्ड डाउनग्रेड करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यावर कोणतंही शुल्क नाही असं कार्ड घ्या. त्यानंतर तुम्ही ते क्रेडिट कार्ड तुमच्याकडे ठेवू शकता. जर तुमच्याकडे अॅन्युअल फी असलेलं कार्ड असेल आणि तुम्ही ते वापरत नसाल तर तुम्ही ते बंद करू शकता.
क्रेडिट कार्ड बंद केल्यास काय होईल?अनेकांना असं वाटतं की जर कार्ड वापरलं जात नसेल तर ते जवळ ठेवण्याऐवजी ते बंद करणं चांगलं. पण, तुमचं क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल हे फार कमी लोकांना माहीत आहे. क्रेडिट कार्ड बंद करण्याऐवजी ते तुमच्याकडे ठेवणं चांगलं. त्याच वेळी, तुम्ही कोणतंही एक कार्ड बंद केल्यास त्याचा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवरही परिणाम होतो. मोठं कर्ज घेताना चांगली क्रेडिट हिस्ट्री तुम्हाला मदत करते.
क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर परिणामतुमचं क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोवरही परिणाम होतो. तुमच्याकडे ३ कार्डे असल्यास, त्यापैकी एकाची मर्यादा २० हजार रुपये, दुसऱ्याची मर्यादा ३० हजार रुपये आणि तिसऱ्याची मर्यादा ५० हजार रुपये आहे. अशात तुमची एकूण मर्यादा १ लाख रुपये असेल. यातील २० हजार रुपये वापरल्यास तुमचा रेशो २० टक्के असेल. जर तुम्ही कार्ड बंद केलं तर तुमचा रेशो वाढेल. जर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो ३० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर बँका तुम्हाला धोकादायक समजतात. जर हे प्रमाण कमी असेल तर तुम्हाला कमी धोका आहे, याचा अर्थ तुम्हाला कर्ज अगदी सहज मिळू शकतं.