Join us

क्रेडिट स्कोअर असेल चांगला तरच मिळेल नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 6:54 AM

सध्या नोकरीच्या अनेक जाहिराती निघत असून, त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर विचारला जात आहे.

चंद्रकांत दडस, उपसंपादक

मुंबई येथील वाणिज्य पदवीधर असलेल्या मोहन शर्मा (नाव बदलले आहे) यांनी सरकारी बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज केला होता. मात्र, शर्मा यांच्या खराब क्रेडिट स्कोअरमुळे त्याचा अर्ज नाकारण्यात आला. शर्मा यांनी अनेक क्रेडिट कार्डांवर पेमेंट केले नव्हते आणि याचा त्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीवर नकारात्मक परिणाम झाला. सध्या नोकरीच्या अनेक जाहिराती निघत असून, त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर विचारला जात आहे.

बँकांना त्यांच्या भरतीमध्ये मदत करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस)ने लिपिक आणि प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी किमान क्रेडिट स्कोअर ६५० ची अट ठेवली आहे. स्थानिक बँकांव्यतिरिक्त, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या (उदा. सिटी बँक, डोएचे बँक, टी-सिस्टम्स) अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासत आहेत. 

नोकरी आणि क्रेडिट स्कोअरस्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने मार्च २०२२ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसरसाठी जाहिरात काढली होती. यात म्हटले होते की, ज्या उमेदवारांनी कोणत्याही बँक किंवा बिगर बँकिंग फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविले आहे आणि त्यांनी नियुक्तीपत्र जारी होण्याच्या तारखेपर्यंत थकबाकीची रक्कम भरली नाही, तर ते पदभरतीसाठी पात्र राहणार नाहीत. स्कोअर तपासणे बरोबर का? कंपन्यांनी कामावर घेण्यापूर्वी उमेदवाराचा क्रेडिट स्कोअर तपासणे बेकायदेशीर नाही. मात्र, संबंधित कंपनी अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर थेट तपासू शकत नाही.  पडताळणीसाठी नियोक्ता अर्जदाराची संमती घेऊन क्रेडिट प्रोफाइल तपासू शकतो.अर्जदारांनी काय करावे? नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्यांनी काही महिने अगोदर त्यांचा क्रेडिट स्कोअर तपासावा. त्यात काही त्रुटी असल्यास, अर्जदाराने त्याबद्दल माहिती मिळवून बँक आणि क्रेडिट ब्युरोच्या मदतीने ती दुरुस्त करून घ्यावी. स्कोअर सुधारण्यासाठी वेळ लागतो आणि ते त्वरित निराकरण होऊ शकत नाही. 

टॅग्स :नोकरीमुंबई