PM Mudra Yojana : तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर सरकारची पीएम मुद्रा योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच PMMY ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत बिगर कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जातं. हे कर्ज मुद्रा लोन म्हणून ओळखलं जातं. हे कर्जे व्यापारी बँका, आरआरबी, स्मॉल फायनान्स बँक, एमएफआय आणि एनबीएफसीद्वारे वितरित केली जातात. www.udyamimitra.in या पोर्टलला भेट देऊनही ग्राहक ऑनलाइन अर्ज करू शकतात.
यात आहेत ३ कॅटेगरी
पीएम मुद्रा योजनेअंतर्गत तीन श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध आहे. लाभार्थी सूक्ष्म युनिट किंवा एंटरप्राइझची वाढ/विकास आणि फंडिंगच्या गरजांवर आधारित या श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत. 'शिशू' या श्रेणीत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळतं. या श्रेणीमध्ये अशा उद्योजकांचा समावेश होतो जे एकतर सुरुवातीच्या टप्प्यात आहेत किंवा ज्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अद्याप कमी निधीची आवश्यकता आहे.
'किशोर' श्रेणीमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज समाविष्ट आहे. या श्रेणीमध्ये अशा उद्योजकांचा समावेश आहे ज्यांनी आधीच त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक पैसे हवे आहेत. तिसरी श्रेणी, 'तरुण' यामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. मुद्रा कर्जामध्ये दिली जाणारी ही सर्वाधिक रक्कम आहे. जर एखाद्या उद्योजकानं आवश्यक पात्रता अटी पूर्ण केल्या तर तो १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतो.
मुद्रा कर्जासाठी, तुमचा व्यवसाय खालीलपैकी एक असावा:
स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग एन्टरप्राईज
दुकानदार
फळ आणि भाजी विक्रेते
कारागीर
शेतीशी संबंधित बाबी जसं की मत्स्यपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कृषी दवाखाने आणि कृषी व्यवसाय केंद्रे, अन्न आणि कृषी प्रक्रिया इ.
कुठून मिळेल लोन?
बँकांव्यतिरिक्त, मुद्रा लोन या कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे उपलब्ध होईल:
सरकारी सहकारी बँक
रिजनल सेक्टर ग्रामीण बँक
मायक्रो फायनान्स संस्था
बँकांव्यतिरिक्त इतर वित्तीय कंपन्या
कसा कराल अर्ज?
तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही उद्यम मित्र पोर्टल www.udyamimitra.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. येथे तुम्हाला नोंदणी करावी लागेल. अर्ज केल्यानंतर, तुमचा अर्ज अनेक कर्ज देणाऱ्या संस्थांना दिसेल. मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी पत्त्याचा पुरावा, आयडी प्रुफ यासारखी महत्त्वाची कागदपत्रं आवश्यक असतील. तुमच्या व्यवसायाचं मूल्यांकन, जोखीम घटक आणि तुमची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन बँक तुम्हाला कर्ज देईल.