finance minister nirmala sitharaman : वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना आर्थिक दृष्टीकोनातून फार महत्त्वाचा असणार आहे. आरबीआयची चलनधारण बैठक या महिन्यात होणार असून व्याजदर कमी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, त्याआधीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेतून संपूर्ण देशाला एक मोठी खुशखबर देणार आहेत. वास्तविक, निर्मला सीतारामनबँकांमधील नॉमिनीशी संबंधित नियमांमध्ये मोठ्या दुरुस्तीसाठी विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकात बँकांमधील खातेधारकांना त्यांच्या बँक खात्यासाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी बनवण्याचा पर्याय मिळणार आहे. या प्रस्तावित दुरुस्ती अंतर्गत खातेदार त्याच्या बँक खात्यासाठी ४ लोकांना नॉमिनी बनवू शकणार आहेत. यासोबतच कोणत्या व्यक्तीला किती हिस्सा द्यायचा हेही खातेदार ठरवू शकणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर होणार
सध्याच्या नियमांनुसार, खातेदार त्याच्या बँक खात्यासाठी फक्त १ नॉमिनी करू शकतो. याचा सरळ अर्थ असा की खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यात जमा केलेले सर्व पैसे (100 टक्के) फक्त नॉमिनीलाच दिले जातील. हे विधेयक यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही मांडण्यात आले होते. आता हिवाळी अधिवेशनात ते पुन्हा सादर करण्यात येणार आहे.
खातेदार ४ वेगवेगळ्या लोकांना नामनिर्देशित करू शकतील
नवीन नियमांनंतर, कोणतीही व्यक्ती त्याच्या बँक खात्यासाठी त्याची पत्नी तसेच आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण किंवा कोणत्याही ४ व्यक्तींना नॉमिनेट करू शकेल. यासोबतच, नॉमिनींपैकी कोणाला किती हिस्सा द्यायचा, हे देखील खातेधारक ठरवू शकतो. बँक खात्यांसाठी नॉमिनी बनवणे फार महत्वाचे आहे. खातेदाराच्या मृत्यूनंतर, त्याच्या बँक खात्यात जमा होणारे सर्व पैसे, त्याने केलेल्या नॉमिनीला कोणतीही अडचण आणि त्रास न होता दिले जातात.
प्रमोद राव यांची कल्पना
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी बनवण्याची कल्पना आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी प्रमोद राव यांनी दिली होती, जे सध्या सेबीच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत.