देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनं शेअर मार्केटमध्येही कमाल केली आहे, तसंच त्यांच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये 2.50 टक्क्यांची वाढ झाली. यानंतर हे शेअर 575 रूपयांच्या जवळ पोहोचले. यानंतर स्टेट बँकेचा मार्केट कॅप आता 5 लाख कोटींच्या पार गेला. या स्तरावर पोहोचणारी स्टेट बँक ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरली आहे.
आता स्टेट बँकेचं मार्केट कॅप 5.10 लाख कोटींच्या जवळ पोहोचले आहे. यापूर्वी खासगी क्षेत्रातील दोन बँका आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांचं मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या वर गेलं होतं. सध्या आयसीआयसीआय बँकेचं मार्केट कॅप 6.40 लाख कोटींपेक्षा थोडं अधिक आहे. तर एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप 8.51 लाख कोटींच्या जवळ आहे. मार्केट कॅपनुसार एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे.
ऑल टाईम हाय
स्टेट बँकेबद्दल सांगायचं झालं तर बुधवारी कामकाजादरम्यान बँकेचा शेअर नव्या ऑल टाईम हाय वर पोहोचला. कामकाजादरम्यान एसबीआयच्या शेअरमध्ये 2.70 टक्क्यांची वाढ होऊन तो 574.65 रूपयांवर पोहोचला. ब्रोकरेज हाऊसदेखील एसबीआयच्या शेअरबाबत सकारात्मक आहेत. सध्या स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजीची अपेक्षा असल्याचं ब्रोकरेज फर्म जेएम फायनॅन्शिअलनं 11 सप्टेंबर रोजी म्हटलं होतं. यासाठी फर्मनं शेअरला बाय रेटिंग दिलं होतं.
(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)