३१ मार्च रोजी या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस आहे. ३१ मार्च रोजी बँकांना रविवारची सुट्टी देखील आहे. परंतु आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सर्व बँकांना ३१ मार्च रोजी सरकारी कामांसाठी शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च हा रविवार असून चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या तारखेला अनेक महत्त्वाचे व्यवहार पूर्ण होतात. या कारणास्तव रिझर्व्ह बँकेनं सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा खुल्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं?
रिसिट्स आणि पेमेंट्स संबंधी कामकाजाच्या हिशोबत ठेवता यावा यासाठी, भारत सरकारने सरकारी रिसिट्स आणि पेमेंटशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा ३१ मार्च २०२४ (रविवार) रोजी व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती केली आहे, असं रिझर्व्ह बँकेनं निवेदनाद्वारे सांगितलं. याप्रकारे बँकांनाही ३१ मार्च २०२४ (रविवार) सरकारी व्यवसायाशी संबंधित सर्व शाखा खुल्या ठेवण्यास सांगण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
आरबीआयच्या एजन्सी बँकांच्या यादीमध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, सिटी युनियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह इतर अनेक बँकांची नावं समाविष्ट आहेत.
सलग दोन दिवस बँका बंद
२४ आणि २५ मार्च रोजी देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद राहणार आहेत. २४ मार्चला रविवार आहे, तो साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे. याशिवाय २५ मार्च रोजी धुलिवंदनाच्या निर्मि पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश भागात बँका बंद राहणार आहेत.
आयकर विभागानंही सुट्टी रद्द केली
यापूर्वी २९ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत येणारा लाँग वीकेंड आयकर विभागाने प्रलंबित करसंबंधित कामांमुळे रद्द केला आहे. २९ मार्चला गुड फ्रायडे, ३० मार्चला शनिवार आणि ३१ मार्चला रविवारी सुट्टी होती. आयकर विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार विभागातील थकबाकीची कामं पूर्ण करण्यासाठी सर्व आयकर कार्यालयं २९, ३० आणि ३१ मार्च रोजी उघडी ठेवली जातील.