नवी दिल्ली : ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेने बुधवारी मायक्रो एटीएम सुरू केले आहे. याद्वारे, देशातील मेट्रो आणि टियर वन शहरांबाहेर राहणाऱ्या डेबिट कार्ड युजर्सना रोख पैसे काढण्याची चांगली सुविधा मिळणार आहे.
बँकेने सांगितले की, या उपक्रमाद्वारे युजर्सना रोख पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी भारतातील 500,000 पेक्षा जास्त बँकिंग पॉईंट्सच्या नेटवर्कचा लाभ घेतला जाईल. मायक्रो एटीएमद्वारे ट्रांजक्शनची सुविधा देण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँक आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि नॅशनल फायनान्शिअल स्विच (NFS) सह इंटिग्रेटेड करण्यात आली आहे.
कोणत्याही बँकेशी संबंधित ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बँकिंग पॉईंटवर मायक्रो एटीएम सुविधा वापरू शकतील. एक ग्राहक मायक्रो एटीएमद्वारे प्रत्येक व्यवहारासाठी 10,000 रुपये काढू शकतो, असे कंपनीने सांगितले. तसेच, मायक्रो एटीएम टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. सुरुवातीला बँक टियर II शहरे आणि अर्ध-शहरी भागात 150,000 युनिट्स उभारणार आहे. या भागात साधारणपणे रोख पैसे काढण्याच्या सेवेची मागणी जास्त असते परंतु एटीएमची संख्या मर्यादित असते, असे एअरटेल पेमेंट्स बँकेने सांगितले.
एअरटेल पेमेंट्स बँकेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गणेश अनंतनारायणन म्हणाले, "मायक्रो एटीएम लाँच करणे हे देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या आमच्या ग्राहकांना सक्षम बनवण्याचे आणखी एक पाऊल आहे. बँकेने लाँच केलेले हे पहिले उपकरण आहे आणि आम्ही याबद्दल उत्साहित आहोत, कारण ते आम्हाला डेबिट कार्ड वापरून कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना सेवा देऊ देते."