Join us  

HDFC Bankच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! शनिवारी १३ तास मिळणार नाहीत 'या' सेवा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 2:27 PM

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार, १३ जुलै रोजी बँकेची ऑनलाइन सेवा १३ तास उपलब्ध राहणार नाही.

HDFC Bank: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार, १३ जुलै रोजी बँकेची ऑनलाइन सेवा १३ तास उपलब्ध राहणार नाही. जर ग्राहकांना बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचं असेल तर ते मंगळवार ते शुक्रवार दरम्यान करावं लागणार आहे, कारण १३ तास ऑनलाइन सेवा न मिळाल्यानं ग्राहकांच्या अडचणी वाढू शकतात.

ग्राहकांना केलं अलर्ट

एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांना ईमेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजेसद्वारे याची माहिती दिली आहे. एचडीएफसी बँकेनं म्हटलं की, शनिवार १३ जुलै रोजी सिस्टम अपग्रेड दरम्यान काही सेवा उपलब्ध नसतील. एचडीएफसी बँकेने दिलेल्या तारखेला एचडीएफसी बँकेशी संबंधित सेवेसाठी सिस्टीम अपग्रेड करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे त्या काळात ही सेवा उपलब्ध होणार नाही. ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांच्या बँकिंग सेवांशी संबंधित कामं आधी किंवा नंतर पूर्ण केली पाहिजे.

कधी सेवा मिळणार नाहीत?

१३ जुलै २०२४ रोजी पहाटे ३:०० ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत म्हणजेच ग्राहकांना जवळपास १३ तास बँक सेवा मिळणार नाही. ही गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही बँकेच्या सुट्टीच्या दुसऱ्या शनिवारी ही अपग्रेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं एचडीएफसी बँकेच्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर आपल्या ग्राहकांना आपल्या बँकेचं काम आधीच करून घेण्याचा सल्ला देत असल्याचं बँकेनं म्हटलंय. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी बँका आपल्या यंत्रणेत बदल करत आहे.

या कालावधीत पुढील सेवा उपलब्ध होणार नाहीत. बँक खात्याशी संबंधित सेवा, बँक खात्यात जमा रक्कम पाहणं, फंड ट्रान्सफरशी संबंधित आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सेवा उपलब्ध होणार नाहीत. याशिवाय पासबुक डाऊनलोड, एक्स्टर्नल मर्चंट पेमेंट सर्व्हिसेस, त्वरित अकाऊंट ओपनिंग, यूपीआय पेमेंट या सेवांचा लाभ घेता येणार नाही.

टॅग्स :एचडीएफसी