Join us

अमेरिकेत धडाधड बँकांना टाळे लागू लागले; सिलिकॉन व्हॅलीनंतर सिग्नेचर बँक बंद केली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:25 PM

या बँकेत मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सीचा साठा. सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर सिग्नेचर बँक अमेरिकेतील मंदीचा बळी ठरली आहे.

बँका बंद पडण्याचे सत्र आता सुरु झाले असून अमेरिकेला मंदीने पुरते वेढल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात जुनी आणि मोठ्या बँकांपैकी एक बँक कायमची बंद झाली होती. आता पुन्हा १५ वर्षांनी अमेरिका त्याच वळणावर येऊन उभा ठाकली आहे. दोन दिवसांपूर्वी सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडल्याचे वृत्त धडकत नाही तोच आज आणखी एक बँक बंद पडल्याचे वृत्त येत आहे. 

क्रिप्टो फ्रेंडली बँक म्हणून ओळखली जाणारी सिग्नेचर बँक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सीचा साठा आहे. त्याचा धोका लक्षात घेता न्यूयॉर्कची ही प्रादेशिक बँक काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर सिग्नेचर बँक अमेरिकेतील मंदीचा बळी ठरली आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने सिग्नेचर बँक ताब्यात घेतली आहे. न्यूयॉर्क राज्याच्या वित्त सेवा विभागानुसार सिग्नेचर बँकेची 110.36 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर बँकेकडे 88.59 अब्ज डॉलर्सच्या ठेवी आहेत. एवढी मोठी बँके टाळेबंदी झाल्याने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. 

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठे संकट 2008 मध्ये आले होते. तेव्हा लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते. यानंतर अमेरिकेसह संपूर्ण जगात आर्थिक मंदी आली होती. आता २००८ पेक्षाही मोठी मंदी आल्याचे सांगितले जात आहे. सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक होती. नवीन-युगातील तंत्रज्ञान कंपन्या आणि उद्यम भांडवल गुंतवणूक कंपन्यांना आर्थिक सहाय्य देणारी ही अमेरिकेची मुख्य बँक होती.  

टॅग्स :अमेरिकाबँकिंग क्षेत्र