Join us  

महागाईदरम्यान रिझर्व्ह बँकेची बैठक आजपासून सुरू, तिसऱ्यांदा स्थिर राहणार का Repo Rate?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 10:24 AM

RBI Monetary Policy Meeting: आरबीआयने गेल्या वर्षी मे महिन्यात व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु फेब्रुवारीपासून रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर आहेत.

RBI Monetary Policy Meeting: सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईसोबत सुरू असलेल्या लढाईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची मंगळवारपासून बैठक सुरू झाली. यामध्ये धोरणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक ८ ते १० ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास १० ऑगस्ट रोजी सकाळी मॉनिटरी पॉलिसी जाहीर करतील.

काय होऊ शकतो निर्णय?महागाईच्या चिंतेदरम्यान रिझर्व्ह बँक व्याजदरांबाबत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी मे महिन्यापासून व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली होती. परंतु फेब्रुवारीपासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर आहे. यानंतर एप्रिल आणि जून महिन्यात झालेल्या बैठकीत बेंचमार्क दरांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नव्हते. यावेळी जर कोणतेही बदल केले नाही, तर ही बदल न करण्याची तिसरी वेळ असेल.  

RBI Repo Rate वर काय म्हणतायत तज्ज्ञरिपोर्ट्सनुसार रिझर्व्ह बँक महागाई पाहता सलग तिसऱ्यांदा व्याज दर स्थिर ठेवू शकतं अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंजाब अँड सिंध बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वरुप कुमार साहा म्हणाले की रिझर्व्ह बँक जागतिक बाबींसह अनेक गोष्टींवर लक्ष ठेवून असते. त्यामुळे नुकत्याच फेडरल रिझर्व्हनं केलेल्या व्याजदर वाढीलाही रिझर्व्ह बँक ध्यानात घेईल. सध्या माझ्या अंदाजानुसार रिझर्व्ह बँक रेपो दर कायम ठेवू शकते. जर जागतिक परिस्थिती स्थिर राहिली तर व्याजदर येत्या दोन ते तीन तिमाहिंमध्ये कायम राहू शकतात, असंही साहा म्हणाले. 

रिझर्व्ह बँक व्याजदराची स्थिती कायम ठेवू शकते. येत्या कालावधीत व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक त्रिभूवन अधिकारी यांनी दिली. तर येस बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंद्रनील पॅन म्हणाले की टॉमेटोसह भाज्यांच्या किंमतीत वाढ होत आहे. या महागाईनंतरही व्याजदरात बदलांची शक्यता नाही.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास