Join us  

होम लोनचा व्याजदर वाढल्यानं टेन्शन आलंय? या चार पद्धतींनी कमी करू शकता ईएमआय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 11:38 PM

गेल्या वर्षभरात ज्या प्रकारे गृहकर्जाचे व्याजदर वाढले आहेत, त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

गृहकर्जाद्वारे अनेक कुटुंबांना घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. परंतु, गेल्या वर्षभरात ज्या प्रकारे गृहकर्जाचे व्याजदर वाढले आहेत, त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून आरबीआयनं रेपो दरात सहा वेळा वाढ केली आहे. या वाढीनंतर रेपो रेट आता ६.५ टक्के झाला आहे. यामुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महाग झालं आहे. लोकांचा ईएमआय खूप वाढला आहे. ज्यांना जास्त ईएमआय नकोय त्यांच्यासाठी बँकांनी कर्जाचा कालावधी वाढवलाय.

गृहकर्जाचं ओझं कमी करण्याच्या उपाययोजनांकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना त्यांच्या ईएमआयचं ओझं कमी करण्याच्या पर्यायांबद्दल जाणून घ्यायचे आहे. याबाबत लोक तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. यामध्ये फ्लोटिंग रेटची निवड, गृहकर्जाचं प्रीपेमेंट आणि कमी दरानं कर्ज देऊ शकेल अशी बँक शोधणे यांचा समावेश आहे. चला या पर्यायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

प्रीपेमेंट करा

प्रीपेमेंट केल्यानं तुमच्या एकूण कर्जाची रक्कम कमी होईल. यामुळे तुमचा EMI देखील कमी होईल. तुम्ही बँकेला एकरकमी रक्कम देऊन तुमच्या कर्जाचा काही भाग प्रीपे करण्याचा पर्याय निवडू शकता किंवा तुम्ही वेळोवेळी काही रकमेची परतफेड करू शकता. प्रीपेमेंट तुम्हाला व्याजच्या रकमेत बचत करण्यास देखील मदत करतं. दीर्घकाळात खूप फरक पडतो. काही बँका प्रीपेमेंटवर दंड आकारतात. त्यामुळे तुम्ही त्याबाबत आधी तपासून पाहणं योग्य ठरेल. जर तुम्हाला प्रीपेमेंटचा अधिक फायदा होत असेल, तर दंड भरण्यात काही नुकसान नाही.

फ्लोटिंग रेट निवडा

तुम्ही फिक्स्ड व्याजदराऐवजी फ्लोटिंग रेटचा पर्याय निवडल्यास, ते तुम्हाला तुमचा EMI कमी करण्यास मदत करेल. जेव्हा तुम्ही फ्लोटिंग व्याजदरावर गृहकर्ज घेता तेव्हा त्याचा व्याजदर निश्चित नसतो. बाजाराच्या परिस्थितीनुसार ते वाढू किंवा कमी होऊ शकते. जेव्हा बाजारात दर कमी असतात, तेव्हा तुमच्या कर्जावरील व्याजदरही खाली येतो. यामुळे तुमचा EMI देखील कमी होतो. परंतु, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा बाजारात दर जास्त असतात तेव्हा तुमचे व्याजदरही वाढतात. त्यामुळे त्यात काही धोकाही आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करणं तुमच्यासाठी चांगलं राहील.

लोन ट्रान्सफर

अनेक वेळा गृहकर्ज घेणार्‍याला असं आढळून येतं की दुसरी बँक त्याला मिळालेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदरानं कर्ज देत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे कर्ज अशा बँकेकडे हस्तांतरित करू शकता ज्याचा व्याजदर तुलनेने कमी आहे. यामुळे तुमचा EMI कमी होईल. याचा तुम्हाला दीर्घकाळात खूप फायदा होईल. व्याजावर खर्च होणारा तुमचा बराचसा पैसा वाचेल. परंतु, यासाठी प्रथम तुम्हाला कमी व्याजदर देणार्‍या बँकेच्या अटी व शर्ती समजून घ्याव्या लागतील.

टॅग्स :बँकपैसा