मी अलीकडेच एटीएम कार्ड विम्याबद्दल ऐकले आहे. हा विम्याचा एक वैध प्रकार आहे की ही फक्त एक अफवा आहे?
- एक वाचक
अलीकडे जवळपास सर्वच बँका आपल्या खातेदारांना डेबिट कम एटीएम कार्डस देतात. त्यामुळे खातेदारांना प्रत्यक्ष बँकेत न जाता एटीएमवर जाऊन रोकड काढता येते. डेबिट कार्डावरून आपल्याला ऑनलाइन खरेदीदेखील करता येते. ग्राहकाने क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट पूर्ण केल्यास अनेक ब्रँड आणि शॉपिंग ॲप्स सवलत देतात. परंतु एटीएम कार्डधारकांना विम्याचे संरक्षण केले जाते याची अनेकांना माहिती नसते. जवळपास सर्व बँका, मग ते सार्वजनिक असो की खासगी, ज्यांची बँक खाती कार्यरत आहेत अशा ग्राहकांना अपघाती हॉस्पिटलायझेशन किंवा अपघाती मृत्यूसाठी विमा कव्हरेज देत असतात. ही एक मोफत वैयक्तिक अपघात विमा संरक्षणासह मिळणारी सुविधा आहे.
यामध्ये वैयक्तिक अपघात कव्हर, दायित्व कव्हर, खरेदी संरक्षण कवच, सामानाचे नुकसान / विलंब आणि बरेच काही समाविष्ट असू शकते. आपले खाते ज्या बँकेत आहे आणि ज्या बँकेचे एटीएम व डेबिट कार्ड आपल्याकडे आहे. त्या बँकेने कोणत्या स्वरूपाचे विमा संरक्षण दिलेले आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली पाहिजे. ही माहिती आपल्या बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला मिळू शकते किंवा त्या बँकेच्या संकेतस्थळावरसुद्धा त्याबद्दलचा तपशील दिलेला असू शकतो.
अपघातग्रस्त व्यक्तीबद्दल जी कागदपत्रे लागत असतील त्याबद्दल माहिती घेऊन क्लेम दाखल करावा लागतो. जर ती व्यक्ती रुग्णालयात दाखल असेल, तर सर्व वैद्यकीय नोंदी व्यवस्थितपणे ठेवाव्यात. दुर्दैवाने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, मृत व्यक्तीच्या नातेवाइकाकडे पोस्टमॉर्टम अहवाल, पोलिस अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र.. असा तपशील असणे आणि तो विशिष्ट कालावधीत दाखल करणे आवश्यक असते. कार्डधारकाने अपघाताच्या अगोदर किमान काही दिवस आपल्या कार्डाचा वापर केलेला असणे आवश्यक असू शकते. याबद्दल आपल्या बँकेचे धोरण काय आहे ते नीट समजावून घेतले पाहिजे.