मुंबई : देशातील बँकांनी मागील ५ वर्षांत १० लाख कोटी रुपयांची बुडालेली कर्जे निर्लेखित केली आहेत. त्यामुळे बँकांना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या अकार्यरत भांडवलापासून (एनपीए) मोठा दिलासा मिळाला आहे. धक्कादायक म्हणजे, दिलेल्या कर्जापैकी केवळ १३ टक्के कर्ज वसूल करण्यात बँकांना यश आले आहे.
रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीनुसार, बुडालेली कर्जे निर्लेखित झाल्यामुळे मागील ५ वर्षांत बँकांचा एनपीए १० लाख ९ हजार कोटी रुपयांनी (१२३.८६ अब्ज डॉलर) कमी झाला आहे. वसूल होण्याची शक्यता नसलेली कर्जे बँकांच्या वार्षिक ताळेबंदातून काढून टाकण्यास कर्ज रिटन ऑफ वा निर्लेखित करणे, असे म्हटले जाते. हा प्रकार कर्जमाफीचा नसतो. मात्र, कर्जवुसलीची प्रक्रिया दिर्घ कालावधीपर्यंत सुरू राहते. बँका छोट्या-मोठ्या कर्जांचे निर्लेखीकरण करीत असतात.
१.३२ लाख कोटींची ५ वर्षांत कर्ज वुसली- मागील ५ वर्षांत बँकांनी १.३२ लाख कोटी रुपयांची बुडालेली कर्जे वसूल करण्यात यश मिळविले आहे. हे प्रमाण खूप कमी आहे. - कोणतेही कर्ज ३ महिन्यांपेक्षा (९० दिवस) अधिक काळ थकल्यास नियमानुसार एनपीएमध्ये टाकले जाते. नंतर ही कर्जे वसूल करणे जड जाते.
एसबीआयच्या ‘एनपीए’त झाली सर्वाधिक घट २ लाख कोटी स्टेट बँक ऑफ इंडिया६७,२१४ कोटी पंजाब नॅशनल बँक६६,७११ कोटी बँक ऑफ बडोदा
एसबीआय, पीएनबी या बँकांची कर्जे विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्यासारख्या उद्योगपतींनी बुडविली असून ते देशाबाहेर पळून गेले आहेत.
काय म्हटले आरबीआयने?- मागील १० वर्षांत निर्लेखित करण्यात आलेल्या कर्जांमुळे बँकांचा एनपीएचा आकडा १३.२२ लाख कोटी रुपयांनी कमी झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सर्वाधिक कर्जे निर्लेखित केली आहेत.- एकूण ७,३४,७३८ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित करण्यात आली आहेत. बहुतांश कर्जे निर्लेखित करणाऱ्या बँकांची नावे मात्र रिझर्व्ह बँकेने दिलेली नाहीत. - ही माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकार याचिकेच्या उत्तरात म्हटले आहे.