Nirmala Sitharaman To Banks: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना एक आदेश जारी केला आहे. हा आदेश बँका आणि वित्तीय संस्थांशी संबंधित कोट्यवधी ग्राहकांसाठी आहे. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात, सर्व ग्राहकांनी त्यांचा उत्तराधिकारी (नॉमिनी) घोषित केला आहे, याची खात्री करण्यास सांगितले आहे. यामुळे बँकांमध्ये पडून असलेल्या आणि कुणीही दावा न केलेल्या हजारो कोटी रुपयांची रक्कम वारसदाराकडे सुपूर्द करता येईल.
निर्मला सीतारामन ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) मध्ये बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, सर्व बँक, आर्थिक संस्था, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा ग्राहक पैशाचा व्यवहार करतो, तेव्हा त्या-त्या संस्थांनी त्याच्या भविष्याचा विचार करावा. ग्राहकाने पैशांचा व्यवहार करताना त्याच्या उत्तराधिकारी/वारसदाराचे नाव आणि पत्ता नोंदवून घ्यावा, असे आदेश दिले आहेत.
35,000 कोटींची रक्कम पडून
अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, देशभरातील बँकांमध्ये सूमारे 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पडून आहे, ज्यावर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. काही रिपोर्टमध्ये ही रक्कम 1 लाख कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. 'टॅक्स हेवन देश' आणि पैशाचे 'राऊंड ट्रिपिंग' हे यासाठी जबाबदार असल्याचेही सीतारामन म्हणाल्या. हे पैसे ग्राहकांना आणि त्यांच्या वारसांना सुरक्षितरित्या परत करण्यासाठी आरबीआयने उद्गम पोर्टल (UDGAM) देखील सुरू केले आहे. हे पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश, अनेक दिवसांपासून बँकांमध्ये दावा न केलेल्या रकमेचा शोध घेणे आहे.