Bank Loan: आजच्या काळात प्रत्येकाला कधी ना कधी कर्जाची गरज भासते. जीवनातील अनेक महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे आवश्यक ठरते. घर खरेदी, शिक्षण, व्यवसाय, आजारपण, वाहन, विवाह, प्रवास किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी वैयक्तिक कर्ज घेतले जाते. मात्र, कधीकधी आर्थिक नियोजन बिघडलं की कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात नाही. अशा परिस्थिती काही वित्तीय संस्था आणि बँका कर्ज वसुलीसाठी एजंट नेमतात. हे वसुल एजंट अनेकदा ग्राहकांना धमकावतात, बेकायदेशीरपणे त्यांची मालमत्ता जप्त करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे अधिकार माहिती असायला हवेत. याविरोधात तुम्ही कायदेशीर पाऊळ उचलू शकता.
कर्ज वसुलीसाठी बँक एजंट तुम्हाला धमक्या देत असेल, तर घाबरू नका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांसाठी काही अधिकार निश्चित केले आहेत, ज्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
- मानवी वागणूक : कर्ज वसुली एजंटने ग्राहकांशी सभ्य आणि मानवी पद्धतीने वागणे आवश्यक आहे. ते ग्राहकांना धमक्या देऊ शकत नाहीत, शिवीगाळ करू शकत नाहीत किंवा त्यांचा अपमान करू शकत नाहीत.
- वेळेची मर्यादा : कर्ज वसुली एजंट ग्राहकांना सकाळी ७ च्या आधी आणि रात्री ७ नंतर कॉल करू शकत नाहीत. ते ग्राहकांना वारंवार किंवा त्रासदायक कॉल करू शकत नाहीत.
- गोपनीयता : कर्ज वसुली एजंट ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखण्यास बांधील आहेत. ग्राहकांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना कॉल करून कर्ज वसुलीसाठी दबाव टाकू शकत नाहीत.
- योग्य माहिती : कर्ज वसुली एजंटने ग्राहकांना कर्जाची रक्कम, व्याजदर आणि परतफेडीच्या वेळापत्रकाची योग्य माहिती देणे आवश्यक आहे.
- कायदेशीर प्रक्रिया : बँका आणि कर्ज वसुली एजंटने कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. ते ग्राहकांच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊ शकत नाहीत.
तुम्ही काय करू शकता?
बँकेच्या ग्राहक सेवा विभागात एजंटच्या वर्तनाची तक्रार करू शकता.
आरबीआयच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा आहे.
एजंट त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवा.
शक्य असल्यास, एजंटच्या धमक्या रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा. रेकॉर्डिंग हा तक्रारीसाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
कुठल्या परिस्थिती एजंट कारवाई करू शकतो?
न्यायालयाचा आदेश असल्यास बँक वाहन किंवा घराचा ताबा घेऊ शकते. मग तो त्याचा लिलाव करू शकतो. पण एजंटला गाडी जप्त करण्याचा अधिकार नाही. जर कोणी रिकव्हरी एजंट असल्याचे भासवून तुम्हाला धमकावले किंवा त्रास दिला, तर त्याच्यावर माहिती न देता वाहन पळवून नेल्याबद्दल खंडणी, धमकी आणि चोरीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.