एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने सोमवारी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. बँकेकडून 360 दिवसांसाठी पैसे जमा केल्यास, 7.10 टक्क्यांपासून ते 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 0.50 टक्के अधिकच्या व्याजाचाही समावेश आहे. ही योजना 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या डिपॉझिटवर लागू असेल.
कुणाला किती व्याज...?
बँक ऑफ बडोदाने (बीओबी) आपल्या निवेदनात म्हटल्यानुसार, बँकेची विशेष अल्प-मुदतीची किरकोळ ठेव योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षाला 7.60 टक्के तर, इतरांना 7.10 टक्के व्याजदर देत आहे. बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक जयदीप दत्ता रॉय यांनी म्हटले आहे की, "बॉब 360 योजनेमुळे शॉर्ट टर्म रिटेल डिपॉजिटमध्ये बँकेची हिस्सेदारी वाढेल."
बँकेचे विद्यमान आणि नवीन ग्राहक 'BOB360' योजना कोणत्याही शाखेत, ऑनलाइन अथवा मोबाईल अॅपच्या मदतीने उघडू शकतात. यापूर्वी बँक 271 दिवसांच्या बल्क डिपॉझिटवर 6.25 टक्के एवढे व्याज देत होती. बँकेकडून 7 दिवसांपासून 14 दिवसांच्या एफडीवर 4.25 व्याज दिले जात आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँकेने डिपॉझिट्सवरील व्याजदर वाढवले होते.