Join us

'या' सरकारी बँकेनं दिला ग्राहकांना झटका, कर्ज महागलं; पाहा किती होणार खिशावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 09:30 IST

पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरांबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. परंतु त्यापूर्वीच सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडणार आहे. यामध्ये व्याजदरांबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. परंतु त्यापूर्वीच सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँक ऑफ इंडियानं व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणं महाग होईल.  

बँकेनं आपल्या लेंडिंग रेटमध्ये १० बेसिस पॉईंट्सनं (०.१० टक्के) वाढ केली आहे. त्यामुळे रिटेलसह इतर कर्जे महाग होणार आहेत. रिझर्व्ह बँक ५ एप्रिल रोजी पतधोरणाचा आढावा जाहीर करणार आहे. त्यापूर्वीच बँकेनं व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ इंडियानं (Bank Of India) शनिवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील. बँकेनं सांगितलं की  'मार्क अप' ०.१ टक्क्यांनी वाढवलं ​​आहे. यामुळे तो २.७५ टक्क्यांवरून २.८५ टक्के झाला आहे. सध्या रेपो दर ६.५ टक्के आहे. अशा परिस्थितीत रेपो आधारित व्याजदर ९.३५ टक्के असेल. 

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेनंही बेस आणि स्टँडर्ड प्राइम लेंडिंग रेटशी संबंधित व्याजदरात ०.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. नवीन दर ३ एप्रिलपासून लागू होणार आहेत. दरम्यान, यावेळीही रिझर्व्ह बँक ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता कमी आहे. बँक रेपो दर जैसे थे ठेवू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :बँक ऑफ इंडियाव्यवसाय