नवी दिल्ली : जर तुम्ही सध्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ इंडिया (Bank Of India) तुमच्यासाठी एक मोठी संधी देत आहे. बँक ऑफ इंडिया परवडणाऱ्या दरात आलिशान निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकत आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. दरम्यान, बँक ऑफ इंडियाकडून 9 डिसेंबर 2022 रोजी मेगा ई-लिलाव (Mega E-Auction) आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये देशातील विविध झोनमध्ये असलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सहभागी होऊन लोक वाजवी दरात मालमत्ता खरेदी करू शकतात.
यासंदर्भात बँकेने ट्विट करून माहिती दिली आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या मेगा ई-लिलावाची माहिती दिली आहे. बँकेने लिहिले की, "मेगा ई-ऑक्शन! परवडणाऱ्या किमतीत शानदार मालमत्ता! मालमत्तेच्या माहितीसाठी भेट द्या - https://ibapi.in/Sale_Info_Home.aspx." याचबरोबर, बँकेने सांगितले आहे की 9 डिसेंबर 2022 च्या लिलावात 1000 हून अधिक मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहकांना कामाची जागा, फ्लॅट/अपार्टमेंट/रहिवासी घर, रिकामी जागा, व्यावसायिक दुकान, औद्योगिक जमीन/इमारत इत्यादी खरेदी करण्याची संधी मिळेल.
Mega E-Auction!
— Bank of India (@BankofIndia_IN) December 1, 2022
Amazing properties at affordable prices!
For property details, please visit: https://t.co/SYyMojqcx4 and https://t.co/EUs4YFoVXq#MegaEAuction#AmritMahotsavpic.twitter.com/Rzs8aolPCS
'या' शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी
बँक ऑफ इंडियाच्या मेगा ई-लिलावात ग्राहकांना बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक आपल्या घरी बसून आरामात ऑनलाइन मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावू शकतात. बँकेकडून थकबाकीदारांच्या यादीत आलेल्या मालमत्तांचा लिलाव केला जातो. दरम्यान, लोकांना कर्ज देताना बँक त्यांची निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी हमी म्हणून आपल्याकडे गहाण ठेवते. कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करू शकली नाही, तर बँक त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल करते.
कसा घेऊ शकता ई-लिलावत सहभाग?
मालमत्तेच्या लिलावाबाबत संबंधित बँकेच्या शाखांना जाहिरात प्रसिद्ध केली जाते. या जाहिरातीमध्ये मालमत्तांच्या लिलावाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी, नोटीसमध्ये दिलेल्या मालमत्तेसाठी ईएमडी म्हणजेच अर्नेस्ट मनी जमा करणे आवश्यक आहे. याशिवाय केवायसी कागदपत्रे संबंधित शाखेत दाखवावी लागतात. लिलावात सहभागी होण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी आवश्यक आहे. संबंधित बँकेच्या शाखेत ईएमडी जमा केल्यानंतर तुम्हाला लिलावात सहभागी होण्यासाठी मान्यता दिली जाते. लॉगिन करण्यासाठी तुमच्या ई-मेल आयडीवर बँकेकडून तुम्हाला आयडी आणि पासवर्ड पाठवला जातो. याच्या मदतीने तुम्ही ई-लिलावात सहभागी होऊन स्वतःसाठी मालमत्ता खरेदी करू शकता.