बँक कर्मचारी डिसेंबर आणि जानेवारी २०२४ मध्ये जवळपास १३ दिवस संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं (AIBEA) ४ डिसेंबरपासून बँक संपाच्या तारखांची घोषणा केली आहे. टप्प्यांमध्ये सुरू राहणारा हा संप २० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या संपामुळे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांसह देशभरातील अनेक बँकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असोसिएशनच्या अधिसूचनेनुसार डिसेंबरमध्ये ६ दिवसांचा संप निश्चित करण्यात आला आहे. आज आपण डिसेंबर आणि जानेवारीमधील संपाच्या तारखा आणि ज्या बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होतील त्यांची माहिती पाहू.डिसेंबरमध्ये या तारखांना बँका बंद४ डिसेंबरच्या संपामुळे पंजाब नॅशनल बँक (PNB), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पंजाब अँड सिंध बँकेचं कामकाज प्रभावित होईल. या वेळापत्रकानंतर बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियावर ५ डिसेंबरला परिणाम होणार आहे. ६ डिसेंबर रोजी कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपात सहभागी होतील. इंडियन बँक आणि युको बँकेचे कर्मचारी ७ डिसेंबरला तर युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी ८ डिसेंबरला संपावर जाणार आहेत. याशिवाय ११ डिसेंबर रोजी खासगी क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत.जानेवारीत या बँका बंद२ जानेवारी रोजी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमधील बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमध्ये ३ जानेवारीला बँक संप होणार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सर्व बँकांमध्ये ४ जानेवारीला तर ५ जानेवारी रोजी दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील सर्व बँका बंद राहतील.
६ जानेवारी रोजी पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील सर्व बँकांमध्ये संप असेल. अखेर १९ आणि २० जानेवारीला देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.
कर्मचार्यांच्या मागण्यांमध्ये सर्व बँकांमध्ये 'अवार्ड स्टाफ'ची भरती करणं आणि बँकिंग क्षेत्रातील कायमस्वरूपी नोकऱ्यांचं आऊटसोर्सिंग बंद करणं यांचा समावेश आहे. काही बँकांच्या नोकऱ्यांच्या आऊटसोर्सिंगनं केवळ ग्राहकांचीच माहिती नाही, तर त्यांच्या पैशांनाही धोका असतो, अशी प्रतिक्रिया एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी दिली.