Join us

खराब Cibil Score मुळे बँका क्रेडिट कार्ड देत नाहीत? 'ही' युक्ती वापरा लगेच क्रेडिट कार्ड मंजूर होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 10:29 AM

Cibil Score : तुमचा CIBIL स्कोअर खूप खराब असेल तर बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यास नाही म्हणू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या प्रकारे क्रेडिट कार्ड मिळवू शकता.

Cibil Score : सध्या बाजारात विविध प्रकारची कर्जे उपलब्ध आहेत. मात्र, कोणतंही कर्ज घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर पहिला तुमचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर तपासला जातो. क्रेडिट कार्ड (Credit Card) हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे. फक्त या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कालावधी दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. यामुळेच आज क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढत आहे. खरंतर, आजकाल क्रेडिट कार्ड बँका स्वतःहून देत असतात. परंतु, जर तुमचा CIBIL स्कोअर खूप खराब असेल तर बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ करू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही जुगाड करुन ते मिळवू शकता.

तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डसाठी (Secured Credit Card) अर्ज करू शकता. तुमचा सिबिल स्कोअर खराब असला तरीही हा पर्याय तुमच्यासाठी फायद्याच ठरेल.

सिक्‍योर्ड कार्ड म्हणजे काय?सिक्‍योर्ड कार्डच्या नावावरून स्पष्ट होते की, ते बँक ठेवीच्या बदल्यात दिलेले कार्ड आहे. हे कार्ड मुदत ठेवीच्या बदल्यात दिले जाते, म्हणजेच हे कार्ड मिळविण्यासाठी बँकेत एफडी असणे आवश्यक आहे. बहुतेक सिक्‍योर्ड कार्ड्समध्ये खर्चाची मर्यादा मुदत ठेव रकमेच्या ८५ टक्केपर्यंत ठेवली जाते. ग्राहकाची एफडी बँकेत असेपर्यंत ग्राहक हे क्रेडिट कार्ड वापरू शकतो.

जर कोणत्याही कारणास्तव सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड वापरकर्त्याने क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरले नाही, तर बँकेला त्याचे मुदत ठेव खाते एनकॅश करून कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे. ज्या लोकांचा क्रेडिट कार्ड अर्ज बँकांनी नाकारला आहे, अशा लोकांसाठी सिक्‍योर्ड क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय आहे.

सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डचे फायदे

  • नियमित क्रेडिट कार्डांप्रमाणे सिक्‍योर्ड क्रेडिट कार्डवर सवलत, ऑफर किंवा बक्षिसे मिळत नाहीत. मात्र, उतर काही फायदे नक्कीच आहेत.
  • वेळेवर बिले भरून, तुम्ही तुमचा खराब क्रेडिट स्कोर सुधारू शकता. हे कार्ड क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यात मदत करते. भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता सुधारली जाऊ शकते.
  • कार्ड मर्यादा तुमच्या एफडीच्या रकमेवर अवलंबून असते. एफडीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी कार्ड मर्यादा चांगली असेल.
  • नियमित क्रेडिट कार्डच्या तुलनेत, त्याचे व्याजदर कमी आहे. कारण, ते मुदत ठेवीच्या बदल्यात दिले जाते. सुरक्षित कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क देखील कमी आहे.
  • एफडीच्या बदल्यात कार्ड मिळत असल्याने मान्यता मिळणे सोपे आहे. खराब क्रेडिट स्कोअरमुळे यात काही फरक पडत नाही. यासाठी तुम्हाला वार्षिक उत्पन्नाचा पुरावा देण्याची गरज नाही.
  • एफडीवर क्रेडिट कार्ड घेतल्याने, कार्ड धारकाला मुदत ठेव खात्यावर व्याजासोबत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय क्रेडिट मर्यादा वाढवण्याचा पर्याय मिळतो.
टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रपैसा