PM Jan Dhan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात २०१४ मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली होती. देशातील नागरिकांना बँकिंग सेवेशी जोडणे हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेंतर्गत लोकांची बँक खाती उघडण्यात आली, जी जन धन खाती म्हणून ओळखली जातात. डिसेंबर २०१४ पर्यंत या योजनेअंतर्गत १०.५ कोटी जनधन खाती उघडण्यात आली होती. जर तुम्हीही या योजनेअंतर्गत तुमचे जन धन खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. जन धन खात्यांसाठी सरकारकडून एक नवीन अपडेट आले आहे.
सर्व जन धन खात्यांसाठी केवायसी आवश्यक
१० वर्षांपासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा केवायसी करणे आवश्यक असल्याचा आदेश सरकारकडून आला आहे. वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बँकांना अशा जन धन खात्यांसाठी नवीन KYC (Know Your Customer) प्रक्रिया स्वीकारण्यास सांगितले आहे.
वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी एटीएम, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि इतर उपलब्ध डिजिटल चॅनेल यांसारख्या सर्व माध्यमांद्वारे जन धन खात्यांच्या री-केवायसीसाठी सर्व प्रक्रियांचा अवलंब करण्याचे सुचवले आहे. सर्व बँकांनी जन धन खाती उघडण्याच्या वेळी सारख्याच उत्साहाने काम करावे आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन सर्वांचे केवायसी पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याशिवाय, केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी बँकांना दिले आहेत.
KYC म्हणजे काय?
KYC करुन घ्या हा शब्द आता तुमच्याही ओळखीचा झाला असेल. बँक, सरकारी योजना किंवा एखाद्या संस्थेंकडून वारंवार KYC करण्यासाठी सांगितले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने know your customer अर्थात KYC च्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत. केंद्रीय बँकेने केवायसीशी संबंधित ६ नियम बदलले आहेत, जे तात्काळ लागू झाले आहेत. 'नो युवर कस्टमर'द्वारे कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकाची ओळख तपासते. मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना फंडींग यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंधित करण्यासाठी केवायसीची मोठी भूमिका आहे.