Home Loan Rates Hike: आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) लोन ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. दोन्ही बँकांनी वेगवेगळ्या कालावधीच्या गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, एमएलसीआरमध्ये (MCLR) ५ bps ने वाढ करण्यात आली आहे. वाढलेले व्याजदर १ सप्टेंबर २०२३ पासून लागू होतील. यामुळे विद्यमान कर्ज धारकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे आणि नवीन कर्ज अर्जदारांना महागड्या व्याजदराचा सामना करावा लागेल.
आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँकेनं सर्व कालावधीसाठी एमएलसीआर ५ bps नं वाढवला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट आणि एक महिन्याचा एमएलसीआर दर ८.४० टक्क्यांवरून ८.४५ टक्के झाला आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर अनुक्रमे ८.५० टक्के आणि ८.८५ टक्के झाला आहे. एक वर्षाचा एमएलसीआर ८.९० टक्क्यांवरून ८.९५ टक्के करण्यात आला आहे.
पीएनबी बँक
पंजाब नॅशनल बँकेनं सप्टेंबर महिन्यात एमएलसीआर दर ५ बेसिस पॉइंटने वाढवला आहे. पीएनबीच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट दर ८.१० टक्क्यांवरून ८.१५ टक्के करण्यात आला आहे. एका महिन्याचा एमएलसीआर दर ८.२० टक्क्यांवरून ८.२५ टक्के झालाय. पीएनबीमध्ये, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर अनुक्रमे ८.३५ टक्के आणि ८.५५ टक्के करण्यात आला आहे. एका वर्षाचा एमएलसीआर आता ८.६० टक्क्यांवरून ८.६५ टक्के झाला आहे. तर तीन वर्षांच्या ५ बीपीएस वाढीनंतर ते ८.९५ टक्के झाले आहे.
ईएमआय वाढणार
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) हा किमान दर आहे ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही. जर बँकेनं एमएलसीआरमध्ये कोणताही बदल केला तर त्याचा व्याजदरावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत कर्जदारांना जास्त ईएमआय भरावा लागतो.