वर्ष संपण्यासाठी ३ आठवडे बाकी असतानाच SBI ने कोट्यवधी ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. बँकेनं ठराविक मुदतीसाठी त्यांचे एफडी दर वाढवले आहेत. नवे दर आजपासूनच लागू होणार आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन ठेवी आणि मुदतपूर्ती ठेवींच्या नूतनीकरणासाठी नवे दर लागू होतील. यासोबतच बँकेतील ज्येष्ठ नागरिकांनाही नवीन दरानुसार अतिरिक्त व्याज मिळणार आहे. नवीन दर २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी लागू होतील. नुकतंच रिझर्व्ह बँकेनं दर बदलले आहेत, त्याचा परिणाम ठेवी दर आणि कर्जाच्या दरांवर दिसत आहे आणि दोन्ही वाढत आहेत.
व्याज दरात किती वाढ?
सध्या ७ दिवस ते ४५ दिवसांच्या मुदतीच्या FD वर ३ टक्के व्याजदर दिला जात आहे. त्याच वेळी ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर ३.९ टक्के व्याजदर दिला जात आहे. त्याचवेळी १८० दिवस ते २१० दिवसांच्या कालावधीसाठी व्याज दर ५.२५ टक्के आहे.
तसंच २११ दिवसांपेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर व्याजदर ५.७५ टक्के आहे. यात एक वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी व्याजदरांमध्ये ०.६५ टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. २ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर व्याजदर ६.७५ टक्के इतका आहे. ३ वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी आणि ५ ते १० वर्षांसाठी ६.२५ टक्के व्याजदर आहे. यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ५० बेसिस पॉइंट्सचे व्याज देत आहे. यासोबतच बँकेच्या वरिष्ठ ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी ३.५ टक्के ते ७.२५ टक्के दर देण्यात येत आहेत.
मुख्य दरातील बदलाचा ठेवीदारांना फायदा
देशातील बँका ठेवींच्या दरात सातत्यानं वाढ करत आहे. वास्तविक रिझर्व्ह बँकेनं प्राइम रेटमध्ये वाढ केल्यामुळे कर्जाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बँकांना लोकांच्या ठेवी आकर्षित करण्याची संधी आहे आणि त्या सतत ठेवींच्या दरात वाढ करत आहेत. गेल्या आठवड्यातच इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देशांतर्गत परदेशी चलन अनिवासी (बँकिंग) मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.